कोल्हापूर महापाैरपदासाठी राष्ट्रवादीकडून 'यांचे' नाव निश्चित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

एकमताने नाव निश्‍चित झाल्याने आमदार हसन मुश्रीफ यांनीही आपल्याला सुखद आणि आश्‍चर्याचा धक्का बसल्याचे सांगीतले. नेहमी महापौरपदाचे नाव निश्‍चित करताना मुलाखती घेऊन मतभेद दुर करावे लागतात. यावेळी मात्र एकमताने नाव निश्‍चित करण्यात आले.

कोल्हापूर - महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून अखेर सूरमंजिरी लाटकर यांच्या नावाची घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. तत्पुर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने लाटकर यांचे नाव निश्‍चित करण्यात आली.

एकमताने नाव निश्‍चित झाल्याने आमदार हसन मुश्रीफ यांनीही आपल्याला सुखद आणि आश्‍चर्याचा धक्का बसल्याचे सांगीतले. नेहमी महापौरपदाचे नाव निश्‍चित करताना मुलाखती घेऊन मतभेद दुर करावे लागतात. यावेळी मात्र एकमताने नाव निश्‍चित करण्यात आले. उद्या दुपारी दोन वाजता महापालिकेत दोन्ही काँग्रेसचे सर्व नगरसेवक एकत्रीत जमून लाटकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांचीही बैठक अजिंक्‍यतारा येथे आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत झाली.

उपमहापाैरपदासाठी मिळणार यांना संधी

उपमहापौरपदासाठी संजय मोहीते आणि अशोक जाधव या दोघानांही प्रत्येकी सहा महिने संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या सहा महिन्यासाठी कोण हे नाव उद्या जाहीर केले जाणार आहे. 

19 नोव्हेंबरला निवडणूक

माधवी गवंडी यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर महापौरपदासाठी 19 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती. महापालिकेत दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना अशी एकत्रित आघाडी आहे. या आघाडीपैकी आणखी कांही काळ महापौरपद हे राष्ट्रवादीच्या वाट्याला आले आहे. यापुर्वी राष्ट्रवादीकडून सरिता मोरे, माधवी गवंडी यांना महापौरपदाची संधी देण्यात आली होती.

या दोन्हीवेळी अखेरच्याक्षणी लाटकर यांचे नाव मागे पडत होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर आज काय निर्णय होतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीस आमदार हसन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर सरिता मोरे, माधवी गवंडी, मुरलीधर जाधव, अजित राऊत, महेश सावंत, सचिन पाटील, सुनिल पाटील, सूरमंजिरी लाटकर, वहिदा सौदागर, माजी नगरसेवक राजेश लाटकर, आदिल फरास, प्रकाश गवंडी, नंदकुमार मोरे, विनायक फाळके, अनिल कदम  उपस्थित होते. 

सुखद आणि आश्‍चर्याचा धक्का 
महापालिकेतील पदाधिकारी निवड म्हणजे नेत्यांचीही कसोटी असते. इछूकंच्या मुलाखती, मनधरणी करणे, रुसवे काढणे, नाराजी दूर करणे आदी कामे नेत्यांना करावी लागतात. सूरमंजिरी लाटकर यांचे नाव तर दोनवेळा ऐनवेळी मागे पडले होते. आज काय होणार याची धाकधुक आमदार मुश्रीफांनाही होती. मात्र सर्वच नगरसेवकांनी एकमताने लाटकर यांच्या नावाला पसंती दिल्यामुळे मुश्रीफही खूश झाले. तुम्ही आज पहिल्यांदाच मला सुखद आणि आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे असेच एकोप्याने रहा. आणखीन एक वर्षाने आपल्याला महापालिकेची निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे त्यासाठी सर्वानी असेच एकोप्याने काम करायचे आहे. 

कालावधीबाबत अनिश्‍चितता 
राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या उर्वरित कालावधीसाठी लाटकर यांना हे पद मिळणार आहे. हा कालावधी अगदी दीड महिन्याचा आहे. हा कालावधी वाढवून मिळण्याबाबत राष्ट्रवादी कॉग्रेस आग्रही आहे. पण अद्यापही त्याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे आता मिळेल तेवढा कालावधीसाठी हे पद लाटकरांनी तुर्त स्विकारले आहे. 

व्हिप बजावला 
राष्ट्रवादी कॉग्रेसच्या सर्व सदस्यांना आज व्हिप बजावण्यात आला.अनुराधा खेडकर या बैठकीसाठी गैरहजर होत्या.पण त्यांनाही व्हिप बजावण्यात आला आहे. 

भाजप ताराराणी आघाडीच्याही हालचाली 
भाजप ताराराणी आघाडीकडूनही महापौरपदाची निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. रात्री हॉटेल चैताली येथे त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस भाजपचे संभाजी जाधव,जयश्री जाधव, अश्‍विनी बारामते या गैरहजर होत्या. गटनेते नाना कदम, विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे यांचा अर्ज भरण्यात येणार आहे. महापौरपदासाठी कोणाचा अर्ज भरायचा यावर उद्या निर्णय होणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Declares Surmanjiri Latkar Name For Mayor