राजेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसने गुरुवारी सातारा शहरातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

सातारा : आता साताऱ्यात पुन्हा घड्याळ... घड्याळ...अन्‌...घड्याळच... अरे अब की बार दीपक पवार, दीपक पवार अशा जयघोषात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आज सातारा शहरात शक्तिप्रदर्शन करीत सातारा लोकसभेसाठी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व सातारा- जावळी विधानसभेसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज गांधी मैदान ते पोवई नाक्‍यापर्यंत रॅली काढली. गांधी मैदान येथे या नेत्यांनी प्रतापसिंह महाराजा यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ढोल- ताशांच्या गजरात रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिन्ह असलेले घडाळ्याचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या होत्या. त्यापाठोपाठ जुने, नवे कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यांनी "मी शरद पवार' असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या.

फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्‍टरमध्ये श्रीनिवास पाटील, दीपक पवार यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रदेश सरचिटणीस पार्थ पोळके, कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस रजनी पवार, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, महिला आघाडी कार्याध्यक्ष जयश्री पाटील आदी विराजमान झाले होते. कार्यकर्ते "अब की बार दीपक पवार.., दीपक पवार...', "आता साताऱ्यात फक्त, घड्याळाचा पुन्हा गजर...' अशा घोषणा देत होते. ही रॅली राजपथावरून कमानी हौद येथे आली. तेथे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा जयघोष करीत फटाक्‍यांच्या आतषबाजी केली.

तेथून रॅली शेटे चौकमार्गे पोलिस मुख्यालय, पोवई नाका येथे आली. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी उमेदवारांना नागरिक शुभेच्छा देत होते. नेते मंडळींही नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत पाठीशी राहण्याचे आवाहन करीत होते. पोवई नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नेते मंडळींनी अभिवादन केल्यानंतर रॅलीचा समारोप झाला. त्यानंतर श्री. पाटील हे कार्यकर्त्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे, तसेच श्री. पवार हे कार्यकर्त्यांसह प्रांताधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी रवाना झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP demonstrated their power in satara