भाजपला साथ देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची हकालपट्टी
महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपला पाठींबा दिलेल्या 18 नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारचे आदेश दिले आहेत.
नगर: महापौर निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपला पाठींबा दिलेल्या 18 नगरसेवकांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरून हटविण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांच्यावर कारवाई केलेल्या पत्रात म्हटले आहे की, नगर महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाने जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये अथवा आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांच्या बाजूने मतदान करू नये असे स्पष्ट आदेश दिलेले होते. परंतु पक्षाचा आदेश डावलून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी भाजपचा महापौर पदाच्या उमेदवारास पाठिंबा देऊन मतदान केलेले आहे अशा प्रकारच्या पक्षविरोधी घडामोडी होत असताना याबाबतची माहिती अथवा कल्पनाही आपण पक्षश्रेष्ठींना दिलेली नव्हती. याबाबत स्पष्टीकरण म्हणून 29 डिसेंबर 2018 रोजी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. आपण या नोटीसीबाबत अद्याप खुलासा न केल्यामुळे आपण पक्ष शिस्तभंग केलेली आहे म्हणून आपणास अध्यक्षपदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.
अहमदनगर महापौर निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठींब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. शिवसेनेला सर्वाधिक 24 जागा मिळवूनही महापौर पदापासून वंचित राहावे लागते. राष्ट्रवादीने भाजपाला पाठींबा दिल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली. पक्षाध्यक्ष शरद पवार अहमदनगर येथे आले असता पाठींबा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी ही कारवाई केली. मात्र आमदार संग्राम जगताप यांच़्यावर कारवाई करण्यात आली नाही.