जुन्यांना डावलण्याचा राष्ट्रवादीला फटका 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

सातारा - जुन्या इच्छुकांना डावलून नवख्या उमेदवारांना संधी देण्याचा फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला आहे. सर्वच तालुक्‍यांत उमेदवार निश्‍चित करताना खुल्या गटातील वाद मिटविण्यात राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले आहेत. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते सतीश फडतरे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतच वेगळ्या वळणावर आली आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना अद्यापपर्यंत तरी प्रत्येक तालुक्‍यातील एक-दोन गटातील उमेदवार निश्‍चित करता आलेले नाहीत. इच्छुकांची मनधरणी करताना नाकीनऊ आले आहे. काही ठिकाणी जुन्यांना डावलून नवीन उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय आमदारांनी घेतल्याने जुने निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुसेगाव येथील सतीश फडतरे व त्यांची पत्नी वैशाली फडतरे यांचा समावेश आहे. त्यांनी पुसेगाव गणातून उमेदवारी मागितली होती. त्याऐवजी तेथे नवख्या उमेदवाराचे नाव निश्‍चित केल्याने नाराज झालेल्या फडतरे दांपत्याने आपल्या पाचशे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी केली आहे. यासंदर्भात भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला. तसेच त्यांचा पक्षप्रवेश व उमेदवारीही दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे "एबी' फॉर्म आज 
दरम्यान, आज भारतीय जनता पक्षाने शक्तिप्रदर्शन करीत पाच तालुक्‍यांत उमेदवारी अर्ज दाखल केले. उर्वरित तालुक्‍यांत उद्या (सोमवारी) अर्ज दाखल केले जाणार आहेत. कॉंग्रेसची यादी आजही गुलदस्त्यात राहिली. त्यांना अद्यापही अपेक्षित उमेदवार मिळालेले नव्हते. राष्ट्रवादीने त्यांच्या आमदारांना दिलेले "एबी' फॉर्म उद्या (सोमवारी) दुपारी दोन वाजता प्रत्येक तालुक्‍याच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले जाणार आहेत.

Web Title: NCP hit