‘राष्ट्रवादी’ची यादी गुलदस्तात..!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 जानेवारी 2017

शिवसेना- भाजपची तुटलेली युती; काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा

सातारा - शिवसेना- भाजपची तुटलेली युती आणि काँग्रेसकडे उमेदवारांची वानवा लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सावध पवित्रा घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादी गुलदस्तात टाकली आहे. पाच फेब्रुवारीलाच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी आपापले उमेदवारी अर्ज भरावेत, अशी सूचना पक्षश्रेष्ठींकडून झाल्या आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या या वेळच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात सर्व पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षासह शिवसेना, काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचा समावेश आहे. काँग्रेसला इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान, पुरेसे उमेदवार काही तालुक्‍यातून मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांचे लक्ष आता ‘राष्ट्रवादी’तील नाराजांकडे आहे, तसेच भाजप व शिवसेनेने त्यांच्या ताकदीनुसार उमेदवार निश्‍चित केले आहेत. येत्या बुधवारपासून (ता. एक) उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल, अशी अपेक्षा सर्वांना होती; पण त्यांच्याकडे इच्छुकांची असलेली गर्दी व त्यातून होणारी बंडखोरी किंवा उमेदवारांची पळवापळवी टाळण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सावध पवित्रा घेत उमेदवारांची यादीच गुलदस्त्यात टाकली आहे; पण प्रत्येक गटातून दोन व जेथे इच्छुकांची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी तीन ते चार उमेदवारांची नावे अंतिम केली आहेत, तर राखीव जागांची यादी मात्र, पूर्ण तयार असली, तरी प्रत्येक ठिकाणी दोन उमेदवार निश्‍चित केले आहेत. त्यातील एकालाच पक्षाची उमेदवारी दिली जाणार आहे. याचा निर्णय स्थानिक आमदारांवर सोपविण्यात आला आहे. येत्या एक तारखेपासून सर्व इच्छुकांनी आपले अर्ज दाखल करावेत, अशी सूचना सर्वांना केली आहे. पाच फेब्रुवारीला पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला ‘एबी फॉर्म’ दिला जाणार आहे. राष्ट्रवादीतील नाराजांवर नजर ठेवून असलेल्या भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची यादी अद्याप अंतिम केलेली नाही. या नाराजांच्या माध्यमातून उमेदवार न मिळालेल्या ठिकाणची भरपाई केली जाणार आहे. भाजप व शिवसेनेची युती फिस्कटल्याने या दोन्ही पक्षांकडून जिल्ह्यात स्वबळावर ताकत अजमविण्याचे काम सुरू आहे, तर उमेदवार मिळविताना काँग्रेसची अवस्था मात्र बिकट झाली आहे. 

उदयनराजेंच्या गळाला कोण...
खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढताना तालुक्‍यात उमेदवारांची जुळवाजुळव सुरू केली आहे; पण सातारा तालुका वगळता इतर तालुक्‍यांत किती उमेदवार त्यांच्या गळाला लागतात, त्यावर त्यांच्या आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

Web Title: ncp list suspense