राष्ट्रवादीचे उमेदवार आयोगाकडे करणार तक्रारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

महापालिका निवडणुकीतील पराभवावर मंथन करण्यासाठी वसंत कॉलनीतील राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली.पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम, अधिकाऱ्यांकडून मिळालेली चुकीची वागणूक, यंत्रणेकडून झालेला त्रास याबाबतच्या तक्रारी मांडल्या. 

सांगली - महापालिका निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर आघाडीच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. भाजपच्या उमेदवारांना अनपेक्षितरित्या मोठ्या प्रमाणात मते मिळाली. त्याबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठी चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच उमेदवारांनी तक्रारी केल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय झाला. आज (ता. ६) तक्रार दाखल करणार आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीतील पराभवावर मंथन करण्यासाठी वसंत कॉलनीतील राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार श्री. पाटील यांच्या हस्ते झाला. त्यानंतर पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम, अधिकाऱ्यांकडून मिळालेली चुकीची वागणूक, यंत्रणेकडून झालेला त्रास याबाबतच्या तक्रारी मांडल्या. 

प्रभाग एकोणीसमधून पराभूत झालेल्या प्रियांका बंडगर म्हणाल्या, ‘‘ज्या उमेदवारांना कुणी ओळखतही नाही, त्यांना सहा-सहा हजार मते कशी काय मिळाली? आम्ही ४००-५०० मतांनी आघाडीवर असताना दुसऱ्या फेरीत ही आघाडी तोडून भाजपचे उमेदवार आघाडीवर गेले. हा संशयास्पद प्रकार ईव्हीएममुळे झाला आहे. सामान्य कार्यकर्त्यांचे ईव्हीएमने बळी घेतलेत. त्यामुळे हे मशिन हद्दपार करावे.’’ 

संतोष सुर्वे म्हणाले, ‘‘प्रभाग क्र. तीनमध्ये मतदानादिवशीच भाजप उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी केली. मतदान केंद्रातून बाहेर पडण्यापूर्वी यंत्र सील करायचे असताना, त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाहेर हाकलले गेले. आयोगाने या मशिनची तसेच एकूणच यंत्रणेची चौकशी करायला हवी.’’ प्रभाग १२ मध्ये न राहणाऱ्या नसिमा शेख या विजयी झाल्याबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केली. 

प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील म्हणाले, ‘‘महापालिकेतील जनताही या निकालाने आश्‍चर्यचकित झाली आहे. त्यांच्या मनातही निकालाबद्दल संशय निर्माण झाला आहे. सुरुवातीच्या १२ फेऱ्यांत आघाडीवर असलेल्या उमेदवारांना शेवटच्या सात फेऱ्यांत पराभूत व्हावे लागले, हे धक्कादायक आहे.’’

बैठकीस माजी महापौर सुरेश पाटील, इद्रिस नायकवडी, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विनया पाठक, धनपाल खोत आदी उपस्थित होते.

Web Title: NCP meeting on Sangli corporation election result