Vidhansabha2019 : शिवेंद्रसिंहराजे भाजपात गेले तर कसं करायचं

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघातील बहुतांश भागावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मजबूत पकड आहे. 

सातारा : कस करायचं ! बाबाराजे म्हणतील तसं. अपना टाईम आयेगा...आपले एकच धाेरण शिवेंद्रसिंहराजे म्हणतील तेच ताेरण... अशा प्रकारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या समर्थकांनी साेशल मिडीयावरुन ते जे निर्णय घेतील ताे मान्य असे म्हणू लागले आहेत. सातारा- जावळी तालुक्‍याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भाजप प्रवेश झाल्यास कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघातील आपल्या आमदारांचे काय अशी अस्वस्थता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदारांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता.25) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनात विविध मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. यावेळी सातारा - जावळीचे विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित राहिले. माध्यमांनी पवार यांना आमदार भोसले यांच्या अनुपस्थितीबाबत विचारल्यानंतर त्यांनी आमदारांची पाठराखण केली. दरम्यान आमदार भोसले हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा दिवसभर सुरु राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातील अस्वस्था वाढली. आज (शुक्रवार) ही सातारा जिल्ह्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचा नेमका कोणाला फायदा होणार, कोणाचा तोटा होणार याची खूमासदार चर्चा होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सद्यस्थितीत सातारा, कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे वर्चस्व आहे. यापूर्वी सातारा तालुक्‍यातील दोन ते तीन जिल्हा परिषद गट कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात समाविष्ट झाले आहेत. या गटावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा अजिंक्‍यतारा कारखाना आणि (कै.) अभयसिंहराजे (भाऊसाहेब) यांचे जुने जाणते कार्यकर्त्यांचे जाळे. या दोन्ही मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांची ही पकड आहे परंतु म्हणावी तेवढी नाही. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जावळी तालुक्यातील कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये जातील. यामुळे आमदारांची सातारा तालुक्‍यातील पकड (कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघ) भाजपच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडेल अशी चर्चा रंगत आहे. 
कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजेंकडे लाखभर मतदान आहे अशी चर्चा आमदार बाळासाहेब पाटील आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांची सुरु आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्यास आपले नेत्यांची अडचणी वाढणार असे ही बोलले जात आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncp mla may come in diffculties if shivendrasinghraje enters bjp