बटन दाबून कशाला, आम्हाला टाकू द्या मतदानाची चिठ्ठी - उदयनराजे भोसले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी पूर्वीप्रमाणे चिठ्ठीद्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

सोलापूर -  ईव्हीएमला व्हीव्हीपॅट जोडल्यामुळे मतदान झाल्यावर चिठ्ठीच पडणार आहे. बटन दाबून चिठ्ठी पाडण्यापेक्षा मतदारांना चिठ्ठ्यांवरच मतदान करू द्या, असे सांगत जपान आणि अमेरिका या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएम नाकारले आहे, ईव्हीएममध्ये हस्तक्षेप करता येणे शक्‍य असल्याने आगामी निवडणुका पारदर्शक होण्यासाठी पूर्वीप्रमाणे चिठ्ठीद्वारे मतदान घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. 

सोलापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी आज सकाळी शहाजहूर दर्गाह व सिद्धेश्‍वर महाराजांचे दर्शन घेतले. सिद्धेश्‍वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अमेरिका, जपान, फ्रान्स, रशिया या देशांनी ईव्हीएम नाकारले असताना आपण ईव्हीएम स्वीकारतो म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहोत का, असा खोचक सवालही त्यांनी केला. ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयात गेले तर ईव्हीएममधील हस्तक्षेप सिद्ध न झाल्यास न्यायालय गुन्हे दाखल करण्याचा इशारा देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार भोसले यांनी दुपारी 12 च्या सुमारास शासकीय विश्रामगृहात महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. वंचित शब्द आपल्याला आवडत नाही. कोणीही त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहू नये. जे तुम्हाला तुमच्या अधिकारांपासून वंचित ठेवतात त्यांना बाजूला काढून वंचित ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

लोकशाही जोडा, ईव्हीएम तोडा 
लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लोकशाही जोडा आणि ईव्हीएम तोडा हे तत्त्व आवश्‍यक आहे. न्याय पाहिजे असेल तर याशिवाय पर्याय नाही. नुकत्याच झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातून ईव्हीएममुळे माझे दोन ते सव्वादोन लाखांचे मताधिक्‍य कमी झाल्याचाही दावा त्यांनी केला. सर्व मतदारसंघांत फेरनिवडणुका होण्याची आवश्‍यकता असल्याचेही खासदार भोसले यांनी सांगितले. जे विजयी होतील असा अंदाज होता तेच पराभूत झाले आहेत. ईव्हीएमच्या विरोधात राजकीय पक्षांसाठी सर्व सामान्यांनीही आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. 

सगळेच आरक्षण रद्द करा... 
आर्थिक मागास असलेल्या प्रत्येक जातीतील व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन जर सरकार चालवत असाल, तर सर्व जाती व धर्मांना समानतेची वागणूक द्या. सर्वांची आरक्षणे काढून आर्थिक निकषांवर सर्वांना आरक्षण द्यावे. मतांसाठी सरकारने आरक्षण व सवलतींद्वारे प्रत्येक समाजाला गोंजारणे चुकीचे आहे. त्यातून जातीयवाद वाढेल आणि दंगली घडतील, असा अंदाजही खासदार भोसले यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Udayanraje Bhosale demanded that elections be voted through a chit