राष्ट्रवादी काँग्रेस करणार ‘परिवर्तन’तून शक्तिप्रदर्शन

NCP
NCP

सातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत जागृती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सध्या राज्यभर निर्धार परिवर्तन यात्रा सुरू आहे. या परिवर्तन यात्रेचे २९ जानेवारीला कोल्हापूरहून कऱ्हाडात आगमन होईल. एकाच दिवशी रहिमतपूर आणि फलटण येथे दोन जाहीर सभा होणार आहेत. यातून सातारा व माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चमध्ये लागणार आहे. त्यामुळे कमी कालावधी उरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर जनतेत जागृती करण्यासाठी निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. या यात्रेतून मोदी व देवेंद्र फडणवीस सरकार गेल्या चार वर्षांत कसे अपयशी ठरले, हे जनतेपुढे मांडले जात आहे. परिवर्तन यात्रेत प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते सभांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीत परिवर्तन घडवून पुन्हा एकदा आघाडी सरकारला संधी देण्याची मागणी करत आहेत. यातून राष्ट्रवादीकडून स्थानिक पातळीवर शक्तिप्रदर्शन होत आहे. सातारा जिल्ह्यात येत्या २९ जानेवारीला निर्धार परिवर्तन यात्रा येत आहे. कोल्हापूरहून सकाळी ११ वाजता परिवर्तन यात्रा कऱ्हाडात येईल. तेथे (कै.) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रा रहिमतपूरकडे मार्गस्थ होईल.

कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील रहिमतपूर येथे पहिली जाहीर सभा दुपारी दोन वाजता होणार आहे. त्यासाठीची सर्व जबाबदारी ही आमदार बाळासाहेब पाटील, कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे, साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील पहिली सभा विक्रमी करण्याचा निर्धार या नेत्यांनी केला आहे. त्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्ते आणण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. या सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे नेते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. बालेकिल्ल्यात होणारे हे शक्तिप्रदर्शन महत्त्वाचे मानले जात आहे. साताऱ्यातूनच परिवर्तनाची नांदी निर्माण केली जाणार आहे. रहिमतपूरच्या सभेनंतर कोरेगावमार्गे परिवर्तन यात्रा फलटणला मुक्कामी जाणार आहे. तेथे सायंकाळी सहा वाजता दुसरी जाहीर सभा होणार आहे. माढा मतदारसंघातील फलटण मतदारसंघात होणाऱ्या या सभेत राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेच्या उमेदवाराचे कॅम्पेनिंग होणार आहे. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व असून, येथील सभेची जबाबदारी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत गर्दीचे सर्व उच्चांक मोडण्याचे प्रयत्न होतील.

३० जानेवारीला यात्रा पंढरपूरकडे 
एकूणच परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात पुढील आठवड्यात राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. सभेनंतर फलटणला मुक्काम असून, दुसऱ्या दिवशी ३० जानेवारीला परिवर्तन यात्रा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com