Loksabha 2019 : पार्थ पवारांच्या एंट्रीने कार्यकर्ते जोमात

NCP Party workers feeling happy because of Parth Pawars entry in loksabha elections 2019
NCP Party workers feeling happy because of Parth Pawars entry in loksabha elections 2019

बारामती शहर : पार्थ पवार यांच्या राजकारणातील एंट्रीने बारामतीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. नव्या दमाचा युवक राष्ट्रीय राजकारणात नशीब आजमावू पाहत असल्याने पक्षीय पातळीवर युवकांना आकर्षित करणारा चेहरा म्हणून आगामी काळात पार्थ पवार यांच्याकडे पाहिले जाईल, असे पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. 

पार्थ यांच्या एंट्रीने राष्ट्रवादीच्या गोटात आज उत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी त्यांच्या खासदारकीचे स्वागत करताना त्यांच्यासाठी वेळ पडली तर मावळ मतदारसंघात जाऊन प्रचार करण्याचीही तयारी केली आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. 

सुप्रिया यांच्या प्रचारानंतर पार्थ पवारांचा प्रचार...
बारामती व मावळच्या निवडणूकांच्या तारखात सहा दिवसांचे अंतर असल्याने बारामतीचा प्रचार संपवून नंतर मावळच्या प्रचारासाठी जाण्याचे अनेक कार्यकर्त्यांनी आतापासूनच नियोजन केले आहे. 23 एप्रिलपर्यंत बारामतीत सुळे यांचा तर त्यानंतर 29 पर्यंत पार्थ पवारांचा प्रचार करायचा असे काही कार्यकर्त्यांनी ठरवले आहे. 

संभाजी होळकर -
अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरद पवार साहेब ज्या वेळेस निर्णय घेतात त्या वेळेस साहेबांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, त्या मुळे त्यांच्या निर्णयाचा आम्ही नेहमीच आदर करतो. त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा परिस्थितीनुसार असतो, त्यामुळे या मागेही त्यांची काही भूमिका निश्चित असेल. पार्थ पवार यांची राष्ट्रीय राजकारणातील एन्ट्री आम्हा कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारी आहे. अजितदादांप्रमाणेच ते आपल्या कर्तृत्वाची छाप राष्ट्रीय राजकारणात निश्चितपणे पाडतील यात शंका वाटत नाही. युवा नेतृत्वाला खासदारकीची संधी मिळाली याचा मनापासूनचा आनंद आहे. विकासाभिमुख दृष्टीकोनातून पवार कुटुंबियांची नेहमीच वाटचाल असते, आता तिसरी पिढी यात सहभागी होते ही बाब आनंदाची आहे. 

आरती शेंडगे गव्हाळे -
बारामती शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस- शरद पवार यांनी जो निर्णय घेतला आहे तो पूर्ण विचाराअंतीच घेतला आहे, घराणेशाहीचा आरोप होऊ नये या उद्देशानेच त्यांनी हा निर्णय घेतला असावा. त्यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सहमतच असतो. पार्थ पवार यांचा राजकारणातील प्रवेश निश्चितपणे युवकांचा उत्साह द्विगुणित करणारा आहे. अजित पवार यांच्याप्रमाणेच पार्थ पवार हेही आपल्या कामाचा ठसा निश्चितपणे उमटवतील यात शंका नाही. 

किशोर मासाळ -
प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य. राष्ट्रवादीच्या सर्वच माढा लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचे स्वागत केले,2009 च्या निवडणुकीत पवार साहेब उच्चांकी मताने माढ्यात निवडुन आले होते याही वेळी चांगले मताधिक्य देण्याचे माढावासीयांनी कबुल केले असताना देखील, तरुण कार्यक्षम चेहर्यांना संधी मिळावी म्हणून पवार साहेबांनी मावळ मतदार संघातून पार्थदादा पवार यांच्या नावावर देखील चर्चा केली, तरुणांची वाढती मतदार संख्या युवा चेहर्यांकडे आकर्षीत होत आहे, याचा फायदा  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला महाराष्ट्रात होणार आहे,  महाराष्ट्रात राजकारणात येऊ पाहणार्या युवा पिढीसाठी साहेबांचा हा निर्णय आदर्शवत आहे.


 

मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. काही दिवसांपूर्वी कुटुंबातून किती लोकांना उमेदवारी द्यायची, असा प्रश्‍न पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच उपस्थित केला होता. मात्र, आज त्यांनी पार्थ हेच मावळमधून लढतील असे स्पष्ट केले. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि पार्थ हे कुटुंबातील दोघे रिंगणात असतील. या उमेदवारीमुळे गेल्या काही महिन्यापासून पार्थ या मतदारसंघात दौरे करत होते. आता त्यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार यांना चांगलीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पिंपरी आणि उरण हे विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, तर चिंचवड आणि मावळ हे भाजपकडे आहेत.

केवळ कर्जतचा अपवाद वगळता राष्ट्रवादीला इतर ठिकाणी घाम गाळावा लागणार आहे. सध्या मावळ हा मतदारसंघ युतीमध्ये सेनेकडे आहे. तो सेनेकडेच राहिल्यास पार्थ यांना लढत तुलनेने सोपी राहील. मात्र, पालघरच्या बदल्यात हा मतदारसंघ भाजपकडे आल्यास मात्र, पार्थ यांना निवडून येणे जड जाईल असा अंदाज आहे. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप इच्छुक आहेत. तसेच बारणे यांची उमेदवारी कायम राहिल्यास जगताप सेनेसाठी किती काम करतील याबाबत साशंकता आहे. त्यामुळे युतीत हा मतदारसंघ कोणाकडे जातो यावरही बरेच अवलंबून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com