40 वर्षे गवत उपटत होता का?; पवारांची पिचडांवर टीका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

अकोल्याच्या व आदिवासींच्या विकासासाठी भाजपमध्ये गेलो, असे सांगणाऱ्यांनी 40 वर्षे काय गवत उपटत होता का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाव न घेता उपस्थित केला. 

अकोले : अकोल्याच्या व आदिवासींच्या विकासासाठी भाजपमध्ये गेलो, असे सांगणाऱ्यांनी 40 वर्षे काय गवत उपटत होता का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे नाव न घेता उपस्थित केला. प्रत्यक्षात त्यांनी पलीकडच्या तालुक्‍यात "विकास' करून आदिवासींसाठी केलेल्या कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे पुढे मोठे संकट येणार असल्याचे दिसल्याने ते अगोदरच भाजपमध्ये गेले, अशी टीकाही पवार यांनी केली. 

येथील प्रचार सभेत पवार म्हणाले, "अकोले तालुक्‍याचा चेहरा बदलण्याचे काम सत्तेचा वापर करून केले. अनेक योजना, प्रकल्प उभारले. पाणीवाटपाचे वाद झाले, त्या वेळी तासन्‌ तास बसून प्रश्‍न मार्गी लावले. कारखान्याला मदत केली. असे सर्व काही दिले असतानाही अनेक वर्षे सोबत राहिलेले तालुक्‍याचे नेतृत्व सोडून गेले.'' 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले, "मी कुस्ती संघटनेचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात, हे मला चांगले ठाऊक आहे. "यांच्या'शी काय कुस्ती खेळायची? "समोर पैलवान नाही' म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय फिरायला येतात का?''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP President sharad Pawar criticize mudhukarrao pichad