मोदींची हिटलरशाही, गव्हर्नरही खिशात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

सांगली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीने सामान्य लोकांची होरपळ झाली आहे. नोटाबंदी, पंतप्रधान मोदी व राज्य सरकारच्या अनेक निर्णयाचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाषणात वाभाडे काढले. पंतप्रधान मोदींवर हिटलरशाहीचा आरोपही काहींनी केला. आमदार पाटील यांनी उद्योजकांसाठी नोटाबंदी निर्णय घेतल्याचा आरोप केला. त्यांनी गव्हर्नरांना खिशात घातल्याची टीका केली. मोर्चात अनेकांच्या हातात नोटाबंदी विरोधात घोषणांचे फलक झळकले.

नोटाबंदीच्या पन्नास दिवसांनंतरही बॅंकांचे व्यवहार सुरळीत सुरू न झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला. आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पक्षाची ताकद दाखवून दिली. झेडपीसमोरील पक्षाच्या कार्यालयापासून मोर्चा निघाला. कामगार भवन, स्टेशन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पटांगणात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आमदार सुमन पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
आमदार जयंत पाटील म्हणाले, ""पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचार थांबेल असे वाटत होते. मात्र शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचारही थांबला नाही.

येत्या दोन वर्षांत पुन्हा काळा पैसा तयार होईल. मोदी भावनेशी खेळून लोकांची दिशाभूल करीत आहेत. नोटाबंदीमुळे शेतकरी, मजूर, व्यापारी, उद्योजकांचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम 2 टक्केने विकास दर घटण्यात होणार आहे. नवआर्थिक धोरण गरिबांना मारक आहे. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटाबंदीला विरोध केल्यामुळे त्यांची फेरनिवड टाळली. विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल यांना पंतप्रधानांनी खिशात घातलंय. गेल्या तीन महिन्यांत दर घटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेली नुकसानभरपाई द्यावी. बॅंकेतील रांगेत किंवा तणावाने 115 जण मृत्युमुखी पडले. त्यांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर करावी. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे.

दिवसाढवळ्या बलात्कार आणि खून होऊनही सरकार तपास करू शकत नाही.''

आमदार सुमन पाटील म्हणाल्या, 'नोटाबंदीमुळे कष्टकऱ्यांचे वांदे झाले आहे. शेतकऱ्यांचा माल कवडीमोल दराने विकावा लागतोय. जिल्ह्यात टंचाई असताना प्रशासन नव्हे सरकारचे मंत्री टंचाई नाकारताहेत. टंचाई आराखड्यालाच वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. टंचाईच नाही म्हणणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर दिसत नाही. जुन्या थकबाकीसाठी प्रादेशिक पाणी योजना बंद आहेत. वीज बिलाचे कारण देऊन अधिकारी दाद देत नाहीत.''

पी. आर. पाटील म्हणाले, की 'काळा पैशाच्या शोधासाठी नोटाबंदी केली. काळा पैसा सापडलाच नाही. मोदींनी सत्तेत आल्यानंतर 100 दिवसांत प्रत्येकी 15 लाख बॅंक खात्यात जमा करण्याची, प्रत्येक वर्षी 2 कोटीप्रमाणे अडीच वर्षात 5 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याच्या घोषणा या नुसत्या वल्गनाच ठरल्या आहेत.''

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे म्हणाले, 'नोटाबंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी शाप ठरलाय. आता तरी या सरकारला सुबुद्धी सुचण्याची गरज आहे.'' लीलाताई जाधव म्हणाल्या, 'गरिबांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झालाय.'' पुष्पाताई पाटील म्हणाल्या, 'घोषणाबाज सरकारला खाली खेचलेच पाहिजे.'' छाया पाटील म्हणाल्या, 'राज्य सरकारने मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या शैक्षणिक सवलतीतून काहीही मिळाले नाही.'' वसुधा कुंभार म्हणाल्या, 'कोपर्डी आणि मुलीवरील बलात्कार आणि खून राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. तरीही मुख्यमंत्री स्वतःकडेच गृहमंत्र्यांचा आग्रह धरून आहेत.'' कल्पना सावंत म्हणाल्या, 'टंचाईतही पिण्याचे पाणी मिळत नाही. कृषी व पाणीपुरवठा योजनांसाठीचे विद्युत बिलात दुप्पट वाढ केली.''

पद्‌माकर जगदाळे, छाया पाटील, इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, प्रमोद इनामदार, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांची भाषणे झाली. झेडपी अध्यक्षा स्नेहल पाटील, लिंबाजी पाटील, आप्पासाहेब हुळ्ळे, भाऊसाहेब पाटील, रमेश पाटील, चन्नाप्पा होर्तीकर, दिनकर पाटील, विनायकराव पाटील, शेडजी मोहिते, मनोज शिंदे, शरद लाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उषाताई दशवंत, महापालिका स्थायी समिती सभापती संगीता हारगे, सुरेखा लाड, नंदाताई पाटील, आशा शिंदे, अविनाश पाटील, बाबासाहेब मुळीक, विराज नाईक, गणपती सगरे आदी उपस्थित होते.

सदाभाऊ भाजपचे चमचे
जिल्हाधिकारी कार्यालय पटांगणावर आमदार जयंत पाटील यांनी स्वतः "नोटाबंदी करणाऱ्या सरकारचे करायच काय, खाली डोकं वर पाय' अशी घोषणा दिली. मोर्चात जिल्ह्यतील सर्व तालुक्‍यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपची चमचेगिरी करणाऱ्या स्वाभिमानीचे मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला.

मै फकीर हूँ....
ताजुद्दीन तांबोळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणात नक्कल केली. ते म्हणाले, ""मेरे भाईओ और बहनो... मै फकीर हूँ..! त्यांनीच नोटाबंदीने सर्वांना फकीर केले.''

आमदार जयंत पाटील म्हणाले...
नोटाबंदी निर्णयाचा उद्योजकांना फायदा
येत्या दोन वर्षात पुन्हा काळा पैसा तयार होणार
सरकारने जिल्हा बॅंकांचा गळा आवळला
दोन टक्केने विकासदर घटणार
विद्यमान गव्हर्नर उर्जित पटेल पंतप्रधानांच्या खिशात
बॅंकेच्या दारातील 115 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

Web Title: ncp rally for currency ban protest