
सांगली : राष्ट्रवादीला सांगली हवी; पण ‘चेहरा’ नाही
सांगली : काँग्रेससोबत आघाडी झाली तर सांगली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने स्वतःकडे घ्यावा, अशी मागणी स्थानिक नेत्यांनी केली आहे. त्याबाबत उघड वाच्यता गेल्या आठवड्यात झाली, मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यासाठी आखणी सुरू आहे. काँग्रेस नेत्या श्रीमती जयश्री पाटील, भाजप नेते पृथ्वीराज पवार यांना राष्ट्रवादीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रस्ताव दिले होते. दोन्हीकडून नकारघंटा आल्यानंतर राष्ट्रवादीने इस्लामपूरकर युवराजांच्या हाती सांगलीचे घड्याळ बांधण्याचा मनसुबा उघड केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील स्थानिक इच्छुकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हा प्रस्ताव शहराध्यक्ष संजय बजाज यांनी मांडला, मात्र जयंत पाटील यांची मनीषा काय, हे उघड झालेले नाही.
राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेत संजय बजाज यांनी सांगली विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे घ्यावा आणि प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर पक्षातून खळखळ बाहेर पडायला लागली आहे. बजाज विरोधकांची कुजबूज सुरू झाली आहे. सांगलीसारख्या मध्यवर्ती मतदारसंघात आयात उमेवारीचा प्रस्ताव रुचलेला नाही. ही जागा राष्ट्रवादीने लढवावी, इथेपर्यंत मागणी ठीक होते, मात्र प्रतीक यांचे नाव पुढे करण्याचा प्रयत्न पक्षात फारसा रुचलेला नाही.
राष्ट्रवादीने शड्डू ठोकला असला तरी उमेदवार कोण, त्यांच्याकडे चेहराच नाही. माजी महापौर सुरेश पाटील यांनी एकवेळ प्रयत्न केला होता. त्यांना साडेचार हजार मते मिळाली. दिवंगत मदन पाटील यांच्या निधनानंतर जयंत पाटील यांनी श्रीमती जयश्री पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी प्रस्ताव ठेवला. मदनभाऊ समर्थकांच्या विरोधानंतर तो बारगळला. राष्ट्रवादीत गेल्यास आपले अस्तित्व संपुष्टात येईल, आपला रिमोट जयंत पाटील यांच्या हाती जाईल, अशी भीती त्यांना वाटली.
राष्ट्रवादीने जयश्रीताईंच्या नकारानंतर भाजपपासून दुरावलेल्या पृथ्वीराज पवार यांना गळ टाकला. जयंत पाटील यांच्याशी सर्वोदय साखर कारखान्याच्या मालकी हक्कावरून असलेला संघर्ष संपवूया आणि एकत्र काम करूया, असा प्रस्ताव दिला. ‘सर्वोदय’च्या बदल्यात सांगलीची आमदारकी’, असा प्रस्ताव होता. माजी नगरसेवक गौतम पवार यांच्यासोबत काही मध्यस्थांच्या बैठकाही झाल्या, मात्र पृथ्वीराज पवार यांनी ‘पुन्हा नाही’, अशी भूमिका घेतली. भाजपचे प्रदेश सचिवपद स्वीकारत ‘रिश्ता वही, सोच नई’चा संदेश दिला. आजही राष्ट्रवादीत गेलेला जुना ‘आप्पा समर्थक’ गट पवार गटाने राष्ट्रवादीसोबत काम करावे, यासाठी आग्रही आहे. दुसरीकडे भाजपने पृथ्वीराज यांना राष्ट्रवादीवर चढाईची मोकळीक दिली आहे.
काही काळ संजय बजाज यांनी ‘मी विधानसभा लढेन’, अशा गप्पा मारल्या. बजाज यांचे राजकीय चातुर्य दांडगे असले, तरी ते विधानसभेचा चेहरा होऊ शकत नाहीत, असे पक्षातील जाणकारांनी त्यांना खासगीत सांगितले आहे. त्यामुळे ‘मी नाही, तर इस्लामपूरचे युवराज’, असा प्रस्ताव त्यांनी मांडला असावा. बजाज यांचे जयंतरावांशी सख्य सर्वज्ञात आहे. त्यांनी जयंतरावांच्या कानावर न घातला हा प्रस्ताव मांडला असेल, असे म्हणणे धाडसाचे होईल. जयंतरावांच्या मनी काय आहे, हे काळ ठरवेल. तूर्त तीन नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने सांगलीवर दावा केला आहे. यावर काँग्रेस गप्प आहे. घोडामैदान दूर आहे. काँग्रेसला इथे राष्ट्रवादीच्या मदतीशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने काही दावा केला तरी काठावर बसून अंदाज घेण्याची काँग्रेस जणांची भूमिकादिसत आहे
Web Title: Ncp Sangli Not Face
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..