सर्व केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांच्या मतांची मोजणी व्हावी - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मतमोजणी करावी, असा शासनाचा नियम आहे. पण खर्‍या अर्थाने सर्वच केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांच्या मतांची मोजणी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले.

सांगली - विधानसभानिहाय पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट मधील स्लिपांची मतमोजणी करावी, असा शासनाचा नियम आहे. पण खर्‍या अर्थाने सर्वच केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील स्लिपांच्या मतांची मोजणी झाली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे व्यक्त केले. 

सांगली येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जनावरांच्या दावणीला चारा द्यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाचे नेतृत्त्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार सुमन पाटील यांनी केले. या प्रसंगी पत्रकारांशी श्री. पाटील यांनी संवाद साधला. 

श्री. पाटील म्हणाले, एक्झिट पोलमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी घाबरून जाऊ नये. लाट निर्माण करून 300 जागा विजयी होतील, अशी काही लाट मोदींची दिसून येत नाही. महाराष्ट्रात आघाडीला 18 ते 22 च्या दरम्यान जागा मिळतील. एक्झिट पोलमध्ये विरोधक हारलेत या भ्रमात देशाची जनता कदापि राहणार नाही, असेही श्री. पाटील म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शेळ्या, मेंढ्यासह मोठ्या प्रमाणावर जनावरे आणलेली होती. विलिंग्डन महाविद्यालयाच्या प्रवेश वर्षापासून सुरू झालेल्या मोर्चात जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP state president Jayant Patil comment