अपुरा, अर्धवट अन् बोगस अर्थसंकल्प - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

इस्लामपूर - राज्य सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प अपुरा व अर्धवट, अन् बोगस असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. हा अर्थसंकल्प सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटला असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग व सभागृहाचा अवमान केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

आमदार पाटील म्हणाले, "या अर्थ संकल्पात कोणत्याही क्षेत्राच्या बाबतीत गंभीरपणे तरतूद केलेली दिसत नाही. केवळ निवडणुकीच्या तोंडावर आपल्यावर नाखूष अशा क्षेत्रांना खुश करण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसतो. सरकार म्हणून दैनंदिन कामकाज असणाऱ्या गोष्टींचाही प्रसिद्धीसाठी अर्थ संकल्पीय भाषणात उल्लेख केला आहे. जे गेल्या पाच वर्षापूर्वी करणे अपेक्षित होते, त्याची आता घोषणा करून जनतेला भुरळ पाडण्याचा सरकारचा डाव दिसतो."

आमदार पाटील म्हणाले, "अर्थसंकल्प हा अत्यंत गोपनीय दस्तऐवज असतो. तो सभागृहात मांडण्यापूर्वी बाहेर फुटलेला आहे. अर्थमंत्री सभागृहात अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर अकाउंटवर अगदी काही क्षणांत ग्राफिक्स इमेज पोस्ट येत होत्या. एक ग्राफिक इमेज तयार करायला अर्ध्या तासांपर्यंत वेळ लागू शकतो. मात्र इथे लगेच पोस्ट होत होत्या, याचा अर्थ हे ग्राफिक्स आधीच तयार करून ठेवले होते. ही बाब गंभीर आहे."

आमदार पाटील म्हणाले, "केवळ रस्ते आणि पूल बांधण म्हणजे विकास काय ?  या रस्ते, पुलावरून ये - जा करणारांच्या जीवनात काय बदल घडविला, याला महत्व आहे. समाजातील महिला, आदिवासी,  दलित आणि अल्पसंख्यांक आदी घटकांच्या भल्यासाठी अर्थ संकल्पात काहीही नाही. आमच्या आघाडी शासनाच्या काळातील अंतरिम अर्थ संकल्प व आताच्या अर्थ संकल्पाची तुलना केली तर हा बोगस अर्थ संकल्प आहे." 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP state president Jayant Patil comment