विरोधी बोलेल त्याच्या मागे शुक्लकाष्ठ लावायचे हेच सरकारचे धोरण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आयकर विभागाने ज्यावेळी त्यांच्या घरावर धाड घातली त्यावेळी कोल्हापूर, सांगली येथील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या फायली आणि आरोग्याच्या शिफारसीची पत्रे आयकर विभागाला मिळाली असतील अशी माझी खात्री आहे. आणि तेच खरे हसन मुश्रीफ यांचे धन आहे. 

आष्टा - जो ऐकणार नाही, जो सरकारच्या विरोधी बोलेल, जो सरकारच्या निमंत्रणाला टाळेल, सरकारी पक्षाच्या आग्रहाला जो बळी पडणार नाही, अशांच्या मागे वेगवेगळ्या एजन्सी लावायच्या, शुक्लकाष्ठ लावायचे हे असे धोरण सरकारचे आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

आमदार हसन मुश्रीफ यांच्या घर व कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्री. पाटील बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, मुश्रीफ हे साधे, सरळ आणि जनतेतले नेते आहेत. आयकर विभागाने ज्यावेळी त्यांच्या घरावर धाड घातली त्यावेळी कोल्हापूर, सांगली येथील सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याच्या फायली आणि आरोग्याच्या शिफारसीची पत्रे आयकर विभागाला मिळाली असतील अशी माझी खात्री आहे. आणि तेच खरे हसन मुश्रीफ यांचे धन आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेऊन काम करणाऱ्या या नेत्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न सत्तारूढ पक्ष करत आहे. अशा या कृतीला जनताच उत्तर देईल, कागलकर निश्चितच याला त्यांची जागा दाखवतील, असा विश्वासही श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

श्री. पाटील म्हणाले, हे काम राजकिय हेतूनेच झाले आहे. मुश्रीफ यांना भाजपचे निमंत्रण मिळाले होते. शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवणारे ते नेते आहेत. यामुळे मुश्रीफ यांनी दिलेल्या बाणेदार उत्तराचा राग आल्यामुळेच त्यांच्यावर सरकारची यंत्रणा तुटून पडली आहे. मात्र कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे. ही जनता मुश्रीफ यांच्या मागे राहील, असेही श्री. पाटील म्हणाले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP State President Jayant Patil comment