भाजपच्या लग्नाला "राष्ट्रवादी'ची वऱ्हाडी!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नगर : महापालिकेत आजच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी गेल्या दोन दिवसांत झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपच्या मदतीने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. उपमहापौरपदाची माळही भाजपच्याच मालन ढोणे यांच्या गळ्यात पडली. "सकाळ'ने आजच्या अंकात प्रसिद्ध केलेला "महापौर-उपमहापौरपदासह सर्व पदे भाजपला' हा अंदाज शंभर टक्के खरा ठरला.

नगर : महापालिकेत आजच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी गेल्या दोन दिवसांत झालेल्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपच्या मदतीने भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. उपमहापौरपदाची माळही भाजपच्याच मालन ढोणे यांच्या गळ्यात पडली. "सकाळ'ने आजच्या अंकात प्रसिद्ध केलेला "महापौर-उपमहापौरपदासह सर्व पदे भाजपला' हा अंदाज शंभर टक्के खरा ठरला.

विशेष म्हणजे भाजपला महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळाल्या होत्या. शिवसेना 24, तर राष्ट्रवादी 19 जागा मिळवून अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होते, तरीही भाजपने महापौरपद पटकावले. "सत्तेसाठी काहीही'चा हा खासा "नगरी' पॅटर्न म्हणून उदयास येणार आहे. कॉंग्रेसने मतदानावर बहिष्कार घातला. या निवडणूक प्रक्रियेत वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने शिवसेनेला मतदान केले म्हणून सभागृहातच त्याला शिवसेनेच्या तीन नगरसेवकांनी मारहाण केली. मतदान प्रक्रिया सुरू होताच कॉंग्रेसच्या पाचही नगरसेविका मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभागृहातून बाहेर पडल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपने भाजपला पाठिंबा देणे आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घातला आहे, असे त्यांनी सांगितले. श्रीपाद छिंदमने शिवसेनेच्या बाळासाहेब बोराटे यांना मतदान करताच त्यांच्या तीन नगरसेवकांनी त्याला सभागृहातच मारहाण केली, तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालत सभागृह सोडले. त्यामुळे महापालिकेत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेच्या उमेदवाराला आठच मते मिळू शकली.

उपमहापौरपदाची औपचारिकता
शिवसेना व कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार घातल्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडीची औपचारिकताच राहिली होती. कॉंग्रेसच्या रूपाली वारे यांनी अर्ज मागे घेतला. शिवसेनेच्या गणेश कवडे यांनी अर्ज मागे घेतला नाही; मात्र त्यांना मतदान करण्यासाठी शिवसेनेचा एकही नगरसेवक सभागृहात नसल्याने त्यांना एकही मत मिळाले नाही. भाजपच्या मालन ढोणे यांना 37 मते मिळाली. श्रीपाद छिंदमला मारहाण झाल्याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेतील दोन सुरक्षा रक्षकांना त्वरित निलंबित करण्याचा आदेश दिला.

Web Title: NCP supports BJP in Nagar Municipal Corporation voting