राष्ट्रवादीकडे खासदारकीसाठी तीन उमेदवार - रामराजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

सातारा - आम्ही काही जणांना या निवडणूक प्रक्रियेतून या वेळी वगळले होते. त्यांनीच पक्षात घाण केली आणि तेच पक्षश्रेष्ठींजवळ जाऊन कोणाला पदाधिकारी करा हे सांगत आहेत. या वेळी साताऱ्यातून खासदारकीला राष्ट्रवादीकडे तीन उमेदवार आहेत, असा टोला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज खासदार उदयनराजेंचे नाव न घेता पत्रकार परिषदेत लगावला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदांची नावे पक्षश्रेष्ठीच निश्‍चित करतील, असेही त्यांनी नमूद केले.

रामराजे म्हणाले, 'या वेळी काहींना आम्ही या प्रक्रियेतूनच वगळले आहे. ज्यांनी पक्षात घाण केली तेच पक्षश्रेष्ठींपुढे जाऊन यांना अध्यक्ष करा त्यांना उपाध्यक्ष करा, असे बडबडत आहेत. भविष्यात गरज पडल्यास समविचारींशी आघाडी करू.''

आगामी अडीच वर्षांत लोकसभेची निवडणूक होईल, त्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकारी दिले जात आहेत का, या प्रश्‍नावर शशिकांत शिंदे म्हणाले, 'अजून अध्यक्षाचे नाव निश्‍चित नाही. कोणाचे नाव निश्‍चित होईल या भ्रमात कोणीही राहू नये. पक्षश्रेष्ठींशी बोलूनच ठरविले जाईल.'' त्यावर रामराजे म्हणाले, 'पक्षाकडे खासदारकीसाठी उमेदवार नाहीत या भ्रमात कोणी राहू नये. आमच्याकडे खासदारकीसाठी तीन उमेदवार आहेत. मी आहे, बाळासाहेब पाटील आहेत, शशिकांत शिंदे आहेत.'' यावर "आता आम्हाला अडचणीत आणा,' असे आमदार शिंदे म्हणाले. त्यावर रामराजे म्हणाले, "तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला राष्ट्रपती करतो.' त्यावर शशिकांत शिंदेंनी हसतच रामराजेंनी ठरविले, तर मी राष्ट्रपती निश्‍चित होऊ शकतो, असे म्हणताच हस्याचे फवारे उडाले.

आमदार शिंदे म्हणाले, 'आज रात्री सर्व आमदारांची भूमिका घेऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची नावे पक्षश्रेष्ठींना कळविली जातील. उद्या (मंगळवारी) सकाळी दहा वाजता त्यांच्याकडून नावे निश्‍चित होतील. त्यासाठी सकाळी नऊ वाजता सर्व सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी बोलावण्यात आले आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेत जाऊन दोन अर्ज दाखल केले जातील.'' संजीवराजेंविषयी एकमत होण्यास वेळ का लागला या प्रश्‍नावर आमदार शिंदे म्हणाले, ""सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्यात येतो. ज्यांना संधी मिळणार नाही, त्यांचा पुढील काळात प्राधान्याने विचार केला जाणार आहे.''

अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल किती ठेवला जाईल, यावर आमदार शिंदे म्हणाले, 'आमच्या सर्वांची मागणी अडीच वर्षांचीच आहे; पण काही सदस्यांनी सव्वा वर्ष संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबतही पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल.''

ते दगड म्युझियमध्ये...
पदाधिकारी निवडीसाठी कोणता निकष लावला असे विचारले असता पक्षाशी एकनिष्ठता आणि पक्षासाठी भूमिका घेणे या मुद्‌द्‌यांवर निवड होईल, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. त्यावर श्री. मानकुमरे काय खिशात दगड घेऊन पक्षनिष्ठा दाखविण्यासाठी आले होते का, असे पत्रकारांनी विचारले. त्यावर मकरंद पाटील म्हणाले, की त्यांच्यावर पडलेले दगड आम्ही म्युझियममध्ये ठेवले आहेत. त्यावर "तो प्रेमाचा वर्षाव होता', या रामराजेंच्या विधानाने एकच हस्या पिकला.

Web Title: ncp three candidate for mp election