खटाव गटामध्ये राष्ट्रवादीच ‘सिकंदर’!

- राजेंद्र शिंदे
शनिवार, 4 मार्च 2017

खटाव - खटाव गट व दोन्हीही गणांत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवून पुन्हा एकदा यहाँ के हम सिकंदर असल्याचे सिद्ध केले. गटात आमदार शशिकांत शिंदे व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जनतेशी असलेला संपर्क, झालेली विकासकामे व भक्कम स्थानिक नेतृत्व हे सगळे घटक एकत्र आल्यानेच राष्ट्रवादीला विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यात यश आले. तरीही भाजपच्या उमेदवारांनी मिळवलेली मते ही राष्ट्रवादीला सावध करण्यासाठी पुरेशी आहेत.

खटाव - खटाव गट व दोन्हीही गणांत राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवून पुन्हा एकदा यहाँ के हम सिकंदर असल्याचे सिद्ध केले. गटात आमदार शशिकांत शिंदे व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा जनतेशी असलेला संपर्क, झालेली विकासकामे व भक्कम स्थानिक नेतृत्व हे सगळे घटक एकत्र आल्यानेच राष्ट्रवादीला विरोधकांना चारीमुंड्या चित करण्यात यश आले. तरीही भाजपच्या उमेदवारांनी मिळवलेली मते ही राष्ट्रवादीला सावध करण्यासाठी पुरेशी आहेत.

खटाव गटात समाविष्ट असलेल्या बहुतांश गावांत राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. तुलनेने काँग्रेस व भाजपची ताकद कमी आहे. तथापि भाजपचे युवा नेते महेश शिंदे यांनी गनिमी पद्धतीने राजकीय डावपेच आखत हळूहळू विरोधकांना दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. ज्या पक्षाचे अगदी निवडणुका जाहीर होईपर्यंत कुठेच अस्तित्व दिसून येत नव्हते, त्या पक्ष व कार्यकर्त्यांत महेश शिंदे यांनी नवचैतन्य आणण्याचे काम केले.

विरोधकांच्या गोटात जाऊन तोडाफोडी करत जास्तीत जास्त कार्यकर्ते हाताला कसे लागतील, यावर त्यांनी भर दिला. अगदी निवडणुकीच्या ऐन मोक्‍यात राष्ट्रवादी व भाजपचे अनेक कार्यकर्ते एकमेकांच्या गोटात सामील झाल्याने भाजपच्या गोटात विजयाचे स्वप्न पडू लागले. 

मात्र, महेश शिंदे सोडले तर दुसरी प्रभावी व्यक्ती भाजपकडे नव्हती. त्यामुळे प्रचार व रणनीती आखण्यात मर्यादा आल्या. 

काँग्रेसच्या गोटातील तानाजी पाटोळे यांनी अचानक अर्ज काढल्याने युवा नेते राहुल पाटील यांना धक्का बसला. पहिल्याच घासाला खडा व राजकारणात विरोधकांकडून अशा पद्धतीच्या झालेल्या चालीने पाटील, त्यांच्या कार्यकर्त्यांची ‘सिंह गेला तरी चालेल, गड गेला तरी चालेल, पण लढायचेच, ’अशी मानसिकता तयार झाली. उमेदवारालाच भाजपने फोडल्याचे शल्य मनात बाळगून काही झाले तरी त्याची परतफेड जशास तशी करायची, या इर्षेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लढा दिला. गणात अपेक्षेपेक्षा मतदारांनी भरभरून साथ देत राहुल पाटील हे भविष्यातील उदयास येणारी मोठी ताकद ठरू शकते, हे दाखवून दिले. खटाव गावातील मतदारांनी पाटील यांना ताकद दिल्याचे दिसून येते. एकूण राजकीय स्थितीचा फायदा घेत राष्ट्रवादीचे आनंदराव भोंडवे यांनी विजय मिळवला.

प्रदीप विधाते यांच्याविषयी गटांत असलेले ‘फिल गुड’चे वातावरण राष्ट्रवादीला पूरक ठरले. कार्यकर्त्यांची एकनिष्ठा व राष्ट्रवादीने एकजुटीने केलेले काम यामुळेच राष्ट्रवादीचा विजय झाल्याचे दिसून येते. महेश शिंदे यांनी रामोशी समाजाचे मधुकर पाटोळे यांना प्रदीप विधातेंच्या विरोधात उभे करून त्यांचे फेव्हरेट कार्ड वापरले. पण, हा प्रयोग विधातेंनी मुत्सद्दीपणे उलटवून लावल्याचे दिसते.

Web Title: ncp topper in khatav group