राष्ट्रवादी कॉंग्रेसला महापौरपदाचे डोहाळे

विठ्ठल लांडगे
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

महापौरपदाचे पुढील वर्षांचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी असेल. मात्र, भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे या पदाचा उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी अडीच वर्षांच्या काळातील महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत. 

 नगर : पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे यांना महापौरपदाची संधी मिळाली. त्या वेळी सर्वाधिक संख्याबळ असूनही शिवसेनेला विरोधात बसावे लागले. आता मात्र महापौरपदाचे पुढील वर्षांचे आरक्षण जाहीर झाले असून, ते अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी असेल. मात्र, भाजपकडे त्यासाठी उमेदवारच नाही. त्यामुळे या पदाचा उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी अडीच वर्षांच्या काळातील महापौरपदाचे डोहाळे लागले आहेत. 

राज्यभर गाजावाजा झालेल्या नगर महापालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 14 जागा मिळविलेल्या भाजपला 18 जागांचा धनी असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने पक्षाची व श्रेष्ठींची ध्येयधोरणे बासनात गुंडाळून महापौरपदासाठी पाठिंबा दिला. चार जागांचे बळ असलेल्या बसपच्या हत्तीचीही त्यांना साथ मिळाली. त्यामुळे तब्बल 24 जागा मिळवीत सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या शिवसेनेची एक नगरसेविका गैरहजर राहून भाजपच्या तंबूत गेली. परिणामी, एक आगळेवेगळे "एकीकरण' होऊन भाजपने कमी जागा मिळूनही महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे लीलया पटकावली. 

केडगावमधील शिवसैनिकांच्या हत्याकांडात शिवसेनेकडून झालेला त्रास व आगामी विधानसभा निवडणुकीतील गणित नजरेसमोर ठेवून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्या वेळी महायुतीचा धर्म सोडून भाजपनेही शिवसेनेची साथ सोडून "राष्ट्रवादी'चा पाठिंबा स्वीकारला होता. बहुमताचा 35 हा जादुई आकडा पूर्ण करण्यासाठी त्या वेळी बसपच्या चार जणांनी साथ केली. 

सध्या शिवसेना (24) व भाजप (14) एकत्र आल्यास युतीचे संख्याबळ 38 होते. मात्र, राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेनेने घेतलेली भूमिका भाजपच्या दृष्टीने अडचणीची ठरली. त्यात 30 वर्षांची युतीदेखील संपुष्टात आली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला साथ करण्याची शक्‍यताच नाही. 

शिवसेनेला बाजूला ठेवून कॉंग्रेस आघाडीसोबत भाजपने हातमिळवणी केल्यास सत्तेची गणिते जुळवता येतात. कॉंग्रेस आघाडीचे 23, भाजपचे 14 असे मिळून "जादुई' आकडा ओलांडता येतो. त्यात कॉंग्रेसचे अवघे पाचच नगरसेवक आहेत. मात्र, आता भाजपऐवजी शिवसेना राज्यात कॉंग्रेस आघाडीसोबत नवी महाशिवआघाडी करण्याच्या तयारीत आहे. तसे झाल्यास नगरमध्ये पुन्हा पेच निर्माण होण्याचीच दाट शक्‍यता आहे. नगरमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच टोकाचा संघर्ष आहे. हा संघर्ष मिटेल का? हा प्रश्‍न येणारा काळच सोडवेल. 

भाजप व राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्यांना आणखी केवळ तीनच नगरसेवकांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी बसप, समाजवादी व एखाद्या अपक्षाची मदत घेतली, तरी सत्ता मिळवता येईल. अर्थात कोणाला सत्तेपासून बाजूला ठेवायचे, याचे आडाखे बांधण्यास सुरवात झाली आहे, हे मात्र नक्की. 

"त्या' वेळी हकालपट्टी..! 

महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याबद्दल त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांसह पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. स्वत: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच ही कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर लोकसभा निवडणुकीत या सर्वच नगरसेवकांना पुन्हा पावन करून घेण्यात आले आणि अलीकडेच पक्षाच्या तत्कालीन शहर-जिल्हाध्यक्षांसह माणिक विधाते आता पुन्हा शहर-जिल्हाध्यक्षही झाले आहेत. 

हे आहेत महापौरपदाचे दावेदार 

रूपाली पारगे : राष्ट्रवादी 
रीता भाकरे : शिवसेना 
रोहिणी शेंडगे : शिवसेना 
शांताबाई शिंदे : शिवसेना 
शीला चव्हाण : कॉंग्रेस 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP wants Mayor's post