राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता येणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

खंडाळा तालुक्‍यातील सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, बाजार समिती ते पंचायत समिती अशी गावपातळीपासून सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेच्या गादीवर विराजमान होणे सोपे आहे.

खंडाळा तालुक्‍यातील सेवा सोसायटी, ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, बाजार समिती ते पंचायत समिती अशी गावपातळीपासून सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा सत्तेच्या गादीवर विराजमान होणे सोपे आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विकासकामांमुळे पक्षाची घोडदौड कायम आहे. त्यामुळे तिन्ही गट व सहा गणांवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल. आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणंद व खंडाळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे. त्याचीच पुनरावृत्ती आगामी निवडणुकीत दिसेल, याची खात्री आहे, तरीही गाफील न राहता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध निवडणूक व्यूहरचना राबवणार आहोत. ही निवडणूक राष्ट्रवादी स्बळावरच लढेल. काँग्रेस हा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. त्याचप्रमाणे शिवसेना व भाजपही रिंगणात असेल. त्याची सर्व जाणीव ठेवूनच राजकीय आखणी करू. कोणीही कितीही यात्रा काढून किंवा जेवणावेळी देऊन मत मिळवता येत नाही. आम्ही विकासकामांच्या जोरावर मतदान घेऊ.

पक्षाकडे इच्छुकांची गर्दी आहे, तरीही वरिष्ठांच्या सल्ल्याने तिकीट वाटप होईल. बंडखोरी होणार नाही. आमदार पाटील हे सर्व घटनांवर लक्ष ठेवून असल्याने सर्व अडचणी व नाराजांवर तोडगा निघेल. 
- दत्तानाना ढमाळ, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सर्व जागा जिंकून चोख उत्तर देवू

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही वरिष्ठ नेते, जुन्या व नव्या फळीतील कार्यकर्त्यांना बरोबर घेवून पक्ष चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजधानी सातारा विकास आघाडीसोबत निवडणुकीला सामोरे जाण्याचा विचारही सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून सर्व जागा जिंकून चोख उत्तर देवू. लोणंद व खंडाळा ही गावे नगरपंचायतीमुळे बाजूला गेली असली तरी ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे खोलवर रुजलीत. अद्यापही गावागावांतील काँग्रेस कार्यकर्ता पक्षाशी ठाम आहे. या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे काँग्रेसला भीती नाही. ‘किसन वीर’चे अध्यक्ष मदन भोसले व खंडाळ्याचे ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या प्रयत्नांतून खंडाळ्यात साखर कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक सोपी आहे. कोणी कितीही प्रलोभने दाखवली, आणाभाका व धाकदपटशाही दाखवली, तरी जनता बळी पडणार नाही. गट व गाणांत इच्छुकांची संख्या मोठी आहे. सर्वच ठिकाणी सक्षम व निवडून येणारे ताकदीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडून केला जात आहे. तालुकाध्यक्षपदाची धुरा सांभाळताना पक्षवाढीसाठी भरीव काम झाले आहे. गावागावांत पक्षाची ध्येय-धोरणे पोचवून कार्यकर्त्यांत उत्साह आणण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचाही निवडणुकीत चांगला परिणाम दिसेल.
 

खंडाळा तालुक्‍यात काँग्रेस भक्कम आहे. त्यामुळे कोणी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी तालुक्‍यात काँग्रेसच्या वर्चस्वाला कोणी धक्का पोचवू शकणार नाही. 
- राजेंद्र कदम, तालुकाध्यक्ष, काँग्रेस

युतीची तयारी; अन्यथा स्वबळावर

खंडाळा तालुक्‍यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समिती गण हे स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी झाली आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असून याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर विचारातून घेतला जाणार आहे. गत पंचवार्षिकला शिरवळ गणाची जागा शिवसेनेला सोडण्यात आली होती. यावेळीही युती झाल्यास भाजपला संधी मिळणे आवश्‍यक आहे.

त्यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, जर तडजोड न झाल्यास भाजप स्वबळावर ही जागा लढवेल. त्याप्रमाणे इतर जागांबाबतही योग्य वेळी शिवसेना व मित्रपक्षांबरोबर युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल. केंद्र व राज्यस्तरावर भाजप सरकार असल्याने विकासकामांच्या जोरावर मते मागणार आहोत. भाजपने आजअखेर कोट्यवधींची कामे केली आहेत.

लोणंद ते महाड रेल्वे मार्ग, शिरवळ ते मांढरदेव घाट रस्ता व भोर तालुक्‍यातील गावे शिरवळ बाजारपेठला जोडली जावीत, या उद्देशाने शिरवळ ते राजापूर (ता. भोर) नीरा नदीवर पूल उभारणे, तालुक्‍यातील मिरजे ते गुठाळे रस्ता, नीरा-देवघर कॅनॉलची रखडलेली कामे केंद्र व राज्य सरकारकडून मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या संदर्भात मंत्री सुरेश प्रभू व गिरीष बापट यांच्याशी बोलणे सुरू आहे.
 

गेली अनेक वर्षे सत्ताधारी पक्षाने विकासकामे न केल्यानेच भाजपला राजकीय संधी चालून आली असल्यामुळे परिवर्तन करून सत्तेवर बसू, याची खात्री आहे.
- प्रकाश देशमुख, तालुकाध्यक्ष, भाजप

केलेल्या विकासावर निवडणूक लढवणार

खंडाळा तालुक्‍यातील अनेक दिग्गज राजकीय नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यावरून शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट होते. त्याचा फायदा शिवसेनेला निश्‍चित होणार आहे. गेले अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी सत्तेवर आहे. मात्र, आजही अनेक समस्यांला जनतेला तोंड द्यावे लागत आहे. केलेल्या विकासकामांच्या जोरावर शिवसेना निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शिवसेनेने मतदारांपुढे सक्षम पर्याय उभा केला आहे. पालकमंत्री विजय शिवतारे, संपर्क नेते नितीन बानगुडे- पाटील व जिल्हाप्रमुख नंदकुमार घाडगे यांच्यासह इतर पक्षांतील नेते तालुक्‍यात विकासकामे करत आहेत. पंचायत समितीवर सलग पाच वर्ष उपसभापतिपदी असलेल्या सारिका माने यांच्या माध्यमातून विविध विकासकामे करता आली. एकूणच परिस्थिती पाहता या निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल, असे वाटत आहे. 

भाजपबरोबरच्या युतीचा व जागा वाटपाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. सध्या नव्याने झालेल्या गट व गणांच्या रचनेचा फायदा शिवसेनेला अधिक होईल. सध्या पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. येथील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी नुकताच नितीन बानगुडे- पाटील व नंदकुमार घाडगे यांच्या उपस्थितीत नोकरी महोत्सव घेतल्याचा फायदा पक्षाला होईल. 

भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. तालुक्‍यातील शेतीला पाणी मिळण्यासाठी, रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. बेरोजगारीचा प्रश्न व पायाभूत सुविधा सोडविण्यासाठीच मतदारांपुढे जाऊ.
- संजयसिंह देशमुख, तालुकाप्रमुख, शिवसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP will single-handedly control