राष्ट्रवादीच्या जिल्हा बॅंकेचे सुकाणू भाजपकडे ! 

राष्ट्रवादीच्या जिल्हा बॅंकेचे सुकाणू भाजपकडे ! 

सातारा : राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे तब्बल आठ संचालक असून, तेही पुढे भाजपचे होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा बॅंकेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. संचालकपदाच्या रिक्त असलेल्या (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जागेवर त्यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील यांना आज घेण्यात आले. मात्र, आगामी काळात शिवेंद्रसिंहराजेंवर अविश्‍वास ठराव आणून त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्याची प्रक्रिया राष्ट्रवादीसाठी सोपी राहिलेली नाही. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या राजकारणात "वेट ऍण्ड वॉच'ची भूमिका सर्वांनी घेतली आहे. 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणाचा अड्डा आहे. येथेच अनेक खलबते होऊन रणनीती व कुरघोड्यांचे राजकारण ठरविले जाते. आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजपमध्ये गेल्याने त्यांचे जिल्हा बॅंकेतील संचालकही त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार आहेत. सध्या त्यांच्या विचारांचे किंवा त्यांना मानणारे आठ सदस्य जिल्हा बॅंकेत आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती प्रवर्ग प्रतिनिधीतून प्रकाश बडेकर, महिला प्रतिनिधी कांचन साळुंखे, तज्ज्ञ संचालक वसंतराव मानकुमरे, औद्योगिक विणकर व मजूर संस्था, ग्राहक आणि पाणीपुवठा तसेच व्यक्तिगत सभासदांतून आलेले अनिल देसाई, कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेतून आलेले दादाराजे खर्डेकर, सोसायटी मतदारसंघातील प्रभाकर घार्गे यांचा त्यात समावेश आहे. यातील अनिल देसाई हे यापूर्वीच भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंच्या भाजप प्रवेशानंतर जिल्हा बॅंकेत त्यांच्या विचारांचे संचालक ही भाजपवासी होण्याची शक्‍यता आहे. पर्यायाने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या या बॅंकेत आता मूळचे राष्ट्रवादीचे; पण भाजपमध्ये जाणारे संचालक वाढण्याची शक्‍यता आहे. असे असले, तरी आगामी काळात जिल्हा बॅंकेत विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव आणणेही अडचणीचे होणार आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेतील राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर काही बदल होणार आहेत. कारण पुढील वर्षे दीड वर्षानंतर जिल्हा बॅंकेच्या निवडणुका होणार आहेत. सध्यातरी जिल्हा बॅंकेचे किती संचालक भाजपमध्ये जाणार यावर भाजपचे या बॅंकेवरील वर्चस्व अवलंबून राहणार आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीत दोन-चार सदस्यांपेक्षा अधिक ताकद नसलेल्या भाजपने गेल्या चार-पाच वर्षांत जिल्ह्यात मुसंडी मारून राजकीय, सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपली ताकद निर्माण केली आहे. या माध्यमातून राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या अर्थिक नाड्यांवर आपले वर्चस्व ठेवण्यात भाजपचे नेते यशस्वी झाल्याचे चित्र आहे. 
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज बॅंकेचे संचालक (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे चिरंजीव व वाईचे आमदार मकरंद पाटील यांना संचालक पदावर घेण्यात आले. त्यामुळे आगामी काळात अविश्‍वास ठरावाच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेत अध्यक्षपद बदलाची रणनीती सुरू झाली आहे; पण ते इतके सोपे नाही. शिवेंद्रसिंहराजेंना मानणाऱ्या संचालकांची ताकद मोठी आहे. परिणामी जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी होऊन भाजपची ताकद वाढू लागल्याचे दिसत आहे. 

साखर कारखानदारीत भाजपचा शिरकाव 

सध्या जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात होणाऱ्या बदलाचा सहकार क्षेत्रावरही परिणाम होणार आहे. जे नेते भाजपमध्ये गेले त्यांच्या सहकार तत्त्वावरील साखर कारखान्यांनाही भाजपकडून मदत होणार आहे. त्यामुळे या कारखान्यावर असलेले राष्ट्रवादीचे वर्चस्व कमी होऊन ते भाजपच्या ताब्यात आल्याचे चित्र आहे. यामध्ये मदन भोसले यांचा किसन वीर साखर कारखाना, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अजिंक्‍यतारा कारखाना, अतुल भोसले यांचा कृष्णा कारखाना यांचा समावेश आहे. याशिवाय, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर साखर उद्योग आहेच. त्यामुळे सहकार क्षेत्रातील दिग्गज कारखाने भाजपच्या ताब्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com