नगर: बंधारा फुटल्याने अडकलेल्या 30 जणांची सुटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नगर जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी जोरदार पाऊस झाला. सीना नदीच्या उपनद्या असलेल्या सोनेवाडी, खडकी, बाबुर्डी बेंद, बाबुर्डी घुमट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अरणगाव शिवारातील ओढ्यावर असलेला तलाव आणि बंधारा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता फुटला. ते पाणी सीना नदीकडे झेपावले.

नगर : तालुक्‍यात अकोळनेर, सोनेवाडी परिसरात अतिवृष्टी झाल्याने अरणगाव शिवारातील तलाव आणि बंधारा फुटल्याने वाळुंज शिवारातील परीट वस्तीला पाण्याचा वेढा पडला होता. त्यामुळे सुमारे 30 जण याठिकाणी अडकले होते. अखेर एनडीआरएफच्या पथकाने यशस्वी मोहिम राबवत यांची सुटका केली.

नगर जिल्ह्यात सर्वत्र बुधवारी जोरदार पाऊस झाला. सीना नदीच्या उपनद्या असलेल्या सोनेवाडी, खडकी, बाबुर्डी बेंद, बाबुर्डी घुमट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अरणगाव शिवारातील ओढ्यावर असलेला तलाव आणि बंधारा बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता फुटला. ते पाणी सीना नदीकडे झेपावले. वाळुंज शिवारातील परीट वस्तीला पाण्याने वेढा दिला. त्यात सुमारे तीस लोक अडकल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. घटनास्थळी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करत बचावकार्य राबविण्यात आले. 14 पुरुष, 14 महिला आणि दोन मुले असे तीस जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. पावसामुळे मोठा अडथळा असूनही ही मोहिम राबविण्यात आली. दरम्यान, सोनेवाडी परिसरातील तलावही धोकादायक झाल्याची माहिती मिळाली असून, प्रशासनाने त्याखालील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

Web Title: NDRF team has successfully rescued 30 people who were marooned in Parit vasti of Walunj village in Nagar