चक्क.. ‘प्रदूषण’च्या अधिकाऱ्यांना घातला मृत माशांचा हार...

Necklace of dead fish worn by pollution officers shirol  marathi news
Necklace of dead fish worn by pollution officers shirol marathi news

कुरुंदवाड (कोल्हापूर) - पंचगंगा प्रदूषणप्रश्नी तेरवाड (ता. शिरोळ) येथील बंधाऱ्यावर पाहणी करण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मृत माशांचा हार घालून सुमारे चार तास घेराओ घालून रोखून धरले.

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा तेरवाड बंधाऱ्यावर ठिय्या

कोल्हापूर व इचलकरंजी पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय अधिकाऱ्यांना सोडणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. प्रदूषणामुळे मृत झालेल्या माशांचा हार अधिकाऱ्यांना घालण्याचा प्रयत्न केला. मृत मासेही भेट दिले. अखेर प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर अधिकाऱ्यांना सोडले.पंचगंगा नदी दूषित झाल्याने पाण्याला दुर्गंधी पसरली असून रसायनयुक्त पाण्यामुळे तेरवाड बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. दूषित पाण्यामुळे पंचगंगा काठावरील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. याबाबतचे वृत्त शुक्रवारी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आज शेतकरी व संघटनांच्या संतप्त कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
आज प्रदूषित पाण्याच्या पाहणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी संजय मोरे, सचिन हरबड हे तेरवाड (ता. शिरोळ) बंधाऱ्यावर आले होते. याची माहिती मिळताच प्रदूषणविरोधी आंदोलनाचे सक्रिय कार्यकर्ते बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, बंडू उमडाळे, दत्तात्रय गुरव, योगेश जिवाजे यांच्यासह कार्यकर्ते बंधाऱ्यावर पोहोचले. त्यांनी श्री. मोरे यांना घेराओ घातला. सुमारे चार तास त्यांना बंधाऱ्यावरच रोखून धरले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोरे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. काही कार्यकर्त्यांनी मृत माशांचा हार अधिकारी मोरेंच्या गळ्यात घातला तर काहींनी मृत मासेच भेट दिले. या वेळी वादावादी झाल्याने गोंधळ उडाला. 

वीजपुरवठा खंडित करणार

दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार संजय काटकर, अव्वल कारकून अनिल पाटील बंधाऱ्यावर आले. पोलिसही आले. आंदोलक व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांत चर्चा झाली. आंदोलकांनी कारवाईचा फार्स नको ठोस कृती करा, असा आग्रह धरला. अखेर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्यात आला. याप्रश्नी उद्या (ता. १८) तेरवाड बंधाऱ्यावर प्रांताधिकारी, तहसीलदार, पाटबंधारे विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिले. इचलकरंजी व औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण करणाऱ्या कारखाने व प्रोसेसवर कारवाई करण्यासाठी नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. शिवाय उद्या त्यांचा वीजपुरवठा खंडित करणार असल्याचे सांगितल्यानंतर अधिकाऱ्यांची सुटका झाली. तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ यांच्याशीही आंदोलकांनी दूरध्वनीवरुन चर्चा केली. जुजबी कारवाई नको ठोस कारवाई हवी, अशी भूमिका विश्वास बालिघाटे, बंडू उमडाळे, दत्तात्रय गुरव यांनी मांडली. सागर पाटील, अभय आलासे, अरविंद सासणे, सुनील सासणे, शंकर सासणे, उमेश चिंचवाडे, गोरख सासणे यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

पर्यावरणमंत्र्यांनी न्याय द्यावा

पंचगंगेची गटारगंगा झाली आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी आम्ही लढतोय. पाच वर्षांत भाजप सरकारने केवळ पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या घोषणा केल्या; प्रत्यक्षात कृती केली नाही. आता सेनेचे मुख्यमंत्री आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आहेत. त्यांनी तरी आम्हाला प्रदूषणातून मुक्त करून न्याय द्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा बालिघाटे यांनी दिला.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com