सोन्याचे मंगळसूत्र किटली ते दुधसंघ असा प्रवास करून परत मिळाले

संजय जगताप
बुधवार, 9 मे 2018

मायणी (सातारा) : शेडगेवाडी (चितळी) येथील एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र गळ्यातुन दुधाच्या किटलीत, किटलीतुन दुध संकलन केंद्राच्या कॅनमध्ये व कॅनमधुन पन्नास किलोमीटरवरील दुध डेअरीत गेले. मात्र दुध संघातील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते परत मिळाल्याने सर्वसामान्य शेडगे कुटुंबियांना सुखद धक्का बसण्यासह दिलासा मिळाला आहे.  

मायणी (सातारा) : शेडगेवाडी (चितळी) येथील एका महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र गळ्यातुन दुधाच्या किटलीत, किटलीतुन दुध संकलन केंद्राच्या कॅनमध्ये व कॅनमधुन पन्नास किलोमीटरवरील दुध डेअरीत गेले. मात्र दुध संघातील कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळे ते परत मिळाल्याने सर्वसामान्य शेडगे कुटुंबियांना सुखद धक्का बसण्यासह दिलासा मिळाला आहे.  

त्याबाबत माहिती अशी की, चितळी (ता. खटाव) येथील शेडगेवाडी भागात राहणाऱ्या वंदना शिवाजी शेडगे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले. त्यांनी घरात खुप शोधाशोध केली. मात्र सापडले नाही. कामाच्या गडबडीत रात्री दुधाच्या किटलीमध्ये मंगळसूत्र टाकल्याचे अचानक त्यांच्या लक्षात आले. मात्र त्यांनी सकाळी म्हशीची धार काढुन चार ते पाच लिटर दुध त्या किटलीतुन दुध संकलन केंद्रात घातले होते. म्हणुन त्या तेथील सिद्धनाथ दुध संकलन केंद्रात गेल्या. केंद्रचालक विलास चव्हाण यांचेकडे त्यांनी गंठणबाबत विचारपुस केली. मात्र दुध कॅनमध्ये ओतताना काहीही निदर्शनास आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही शेडगे यांनी इस्लामपुर येथील राजारामबापू दुध संघात चौकशी करण्यास विनंती केली. दुध संकलक चव्हाण यांनी तातडीने इस्लामपुर येथील दुधसंघात संपर्क करुन सोन्याच्या मंगळसूत्राबाबत चौकशी केली.

संघ व्यवस्थापनाने प्रकाश ताटे व पुकार तांबोळी या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधुन विचारणा केली. त्यावेळी दुध गाळण्याच्या पहिल्या टप्प्यातच आमुक नंबरच्या कॅनमधील दुधात मंगळसूत्र आढळुन आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दुध संघाच्या व्यवस्थापनाने शेडगेवाडी येथील दुधसंकलक 
विलास चव्हाण यांचेशी संपर्क साधुन मंगळसूत्र सापडल्याची माहिती दिली. गंठण घेवुन जाण्यास सांगितले. दरम्यान, संघाच्या कार्यालयात संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या हस्ते शिवाजी शेडगे यांचेकडे मंगळसूत्र सुपुर्त करण्यात आले. त्यावेळी विलास चव्हाण, पुकार तांबोळी, प्रकाश ताटे आदी उपस्थित होते.

दरम्यान, सुमारे तीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र परत मिळाल्याने सर्वसामान्य शेडगे कुटुंबियांना सुखद धक्का बसला आहे. दिलासा मिळाला आहे. कष्टाचा पैसा वाया जात नाही. हेच त्यामुळे 
सिद्ध झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन दुध बिल मिळताच दुध संघातील प्रामाणिक कर्मचाऱ्यांना बक्षीसी देणार असल्याचे त्यांनी 
आवर्जुन सकाळला सांगितले.    

Web Title: neckless traveled milk can to milk union and get back

टॅग्स