पाणीप्रदूषण टाळण्यास उत्सवांतून पुढाकाराची गरज

श्रीकांत कात्रे - @shrikantkatre
रविवार, 29 जानेवारी 2017

वाईतील कृष्णामाई उत्सवाला शनिवारी सुरवात झाली. एका नदीचा उत्सव साजरा करण्याची ही परंपराच न्यारी. मुळात कृष्णा नदी म्हणजे केवळ वाईचीच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशसाठी वरदायिनीच. पाण्याचे महत्त्व नव्याने सांगण्याची आवश्‍यकता नाही. पाणी म्हणजेच जीवन. म्हणूनच नद्यांना माता म्हणूनही संबोधले जाते.

वाईतील कृष्णामाई उत्सवाला शनिवारी सुरवात झाली. एका नदीचा उत्सव साजरा करण्याची ही परंपराच न्यारी. मुळात कृष्णा नदी म्हणजे केवळ वाईचीच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशसाठी वरदायिनीच. पाण्याचे महत्त्व नव्याने सांगण्याची आवश्‍यकता नाही. पाणी म्हणजेच जीवन. म्हणूनच नद्यांना माता म्हणूनही संबोधले जाते.

कृष्णामाई उत्सवातून तीच भावना वर्षानुवर्षे जोपासली जात आहे. वाईतील भीमकुंड घाटावर सुरवात झाल्यावर मधली आळी, धर्मपुरी, गणपती आळी, ब्राह्मणशाही, रामडोह आळी, गंगापुरी अशा एकूण सात घाटांवर सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव म्हणजे वाईची एक सांस्कृतिक परंपरा. सुमारे साडेतीनशे वर्षांपासून सुरू असणारी. आपल्या गावच्या नदीविषयी असणारी भावना व्यक्त करणारा हा उत्सव लोकांच्या जगण्याला आनंद देतोच. परिसरातील जैवविविधता जपण्याचा संदेश देत पर्यावरणाला पूरक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठीही उत्सवांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाण्याच्या कमतरतेचा प्रश्‍न जगभर भेडसावतो. पाणी नाही म्हणून चिंता आणि पाणी असेल, तर पाण्याच्या प्रदूषणाचे संकट. असे प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. वाईतील कृष्णा नदीच्या स्वच्छतेबाबतही गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. कृष्णामाई उत्सवात बहुतेक वाईकर सहभागी होतात. उत्सवातून मिळणारे चैतन्य वर्षभर आनंदाने जगण्याची उमेद देते. केवळ वाईच नव्हे तर क्षेत्र महाबळेश्‍वरपासून कृष्णेकाठच्या माहुली, लिंब, चिंचणेर, कऱ्हाड अशा बहुतेक गावांत विविध प्रकारे कृष्णा नदीविषयी ‘माता’ म्हणून उत्सवाच्या माध्यमातून आदर व्यक्त होतो. या सर्वच ठिकाणी जागरूक राहण्यासारखी स्थिती आहे. महाबळेश्‍वरला उगम पावून जोरपासून नदी वाहू लागते.

गोळेगावपासूनच नदीच्या प्रदूषणास सुरवात होते. वाईनंतर पुढे भुईंज, सातारा, कऱ्हाड अशा मोठ्या गावांतून प्रवास करताना अधिक प्रदूषित होत राहते. ‘सकाळ’ने कृष्णा नदी स्वच्छतेची मोहीम फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केली. नदी स्वच्छतेसाठी स्थिती मांडून लोकांमध्ये जागृतीचा प्रयत्न करताना सुरवातीस जलपर्णी हटविण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन केले.

‘सकाळ’च्या आवाहनास प्रतिसाद देत संगम माहुली व चिंचनेर वंदन (ता. सातारा) या दोन गावांत जलपर्णी काढण्याचे काम सुरू झाले. या मोहिमेला सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. सातारा, कऱ्हाड व वाई तालुका पंचायत समितीच्या वतीने नदीकाठच्या गावांतील सरपंच व ग्रामसेवकांची बैठक घेऊन या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय झाला. वाई शहरात जूनमध्ये मोहिमेला मोठ्या प्रमाणात सुरवात झाली. आमदार मकरंद पाटील यांनी व जिल्हाधिकारी आश्‍विन मुद्‌गल यांनी पुढाकार घेतला.

नगराध्यक्षांसह पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी वर्गाचा सक्रिय सहभाग राहिला. जलपर्णी हटविण्याचे काम झाले. नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनीही कृष्णा नदी स्वच्छतेसाठी वाई परिसराला भेट देत प्रोत्साहन दिले. नदी स्वच्छतेची प्रक्रिया सुरू झाली, तरीही त्यात सातत्याची गरज आहे. कारण नदीचे प्रदूषण वाढण्यातही सातत्य आहे. वाईतील ‘आस्था’ संस्थेने जैवविविधतेचे सर्वेक्षण केले आहे. त्याचे निष्कर्ष पाहिले तरी प्रदूषणापासून नदी मुक्त करण्याबाबतचे गांभीर्य लक्षात येते. ‘आस्था’ व आणखी काही संस्था पर्यावरण संतुलनासाठी घनकचरा वर्गीकरण, सांडपाणी शुद्धीकरण, वृक्षारोपण आणि लोकजागृतीसारखे उपक्रम राबवीत आहेत; परंतु हे काम एका संस्थेचे किंवा व्यक्तीचे नाही. लोकांच्या सहभागाबरोबरच नगरपालिका, प्रशासन, सामाजिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न केले तर नदीच्या पर्यायाने पाण्याच्या प्रदूषणमुक्तीचे आव्हान पेलण्यास मदत होणार आहे. जैवविविधतेत असणारी समृद्धता टिकविण्यासाठीही प्रदूषण रोखण्याची आवश्‍यकता आहे. केवळ मानवच नव्हे, तर वनस्पती, पक्षी, फुलपाखरे अशा सर्वच घटकांचे जगणे सुसह्य होण्यासाठी या मोहिमेत सर्वांचा सहभाग प्रेरक ठरणार आहे.   

वाई आणि कृष्णामाई उत्सवाचे निमित्त साधून जिल्ह्यातील सर्वच नद्यांबाबत आणि पाण्याच्या स्त्रोतांबाबत जागरूक राहण्याची वेळ आली आहे. नद्या किंवा ओढ्यावरही मोठ्या धरणांपासून छोटेछोटे बंधारेही झाले आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रवाह सातत्याने वाहू शकत नाही. पाणी प्रवाही नसेल तर प्रदूषणवाढीला मदत होते. ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. केवळ वाई आणि कृष्णाच नव्हे तर प्रत्येक गावाजवळील नदीचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न व्हायला हवेत. नदीमध्ये सांडपाणी मिसळू नये, याच्या व्यवस्थापनासाठी गावागावांनी पुढाकार घ्यायला हवा. ‘सकाळ’च्या कृष्णा स्वच्छता मोहिमेमुळे कामाला सुरवात झाली; परंतु आता भविष्यातील पिढ्यांचा विचार करून सांडपाणी व्यवस्थापन, ओढ्यांचे पुनरुज्जीवन यासारख्या उपायांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी लोकांचा एकत्रित पाठपुरावा हवा. कृष्णामाईचा उत्सव सुरू आहे, तसाच सध्या राजकारणातीलही एक उत्सव सुरू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा. या निवडणुकीतील राजकारण आता अधिक रंगतदार होत जाईल. ते होऊ दे; परंतु विकासाच्या मुद्‌द्यांमध्ये आपापल्या परिसरातील पाणीप्रश्‍न आणि पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पक्षांनी आणि उमेदवारांनीही पुढाकार घ्यायला हवा. 

वाई, सातारा, कऱ्हाड यासारख्या पालिकांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची मदत घेऊन सांडपाणी व्यवस्थापनाला महत्त्व देण्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून छोट्या गावांमध्येही यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या मनात याविषयी किमान जाणीव असणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: The need to avoid water pollution festival initiative