अत्याधुनिक यंत्रणांची कमतरता 

प्रवीण जाधव
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील रेडिओ डायग्नोस्टिक विभाग हा रुग्णांसाठी शासनाने दाखवलेल्या आश्‍वासनांच्या गाजराचा एक भाग बनला आहे. या रुग्णालयात किमान सिटी स्कॅन मशिनसह अन्य आधुनिक यंत्रणांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. 

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील रेडिओ डायग्नोस्टिक विभाग हा रुग्णांसाठी शासनाने दाखवलेल्या आश्‍वासनांच्या गाजराचा एक भाग बनला आहे. या रुग्णालयात किमान सिटी स्कॅन मशिनसह अन्य आधुनिक यंत्रणांची चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने पाठपुरावा करणे आवश्‍यक आहे. 

राज्यातील बहुतांश जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटी स्कॅनची सुविधा आहे. जिल्हा रुग्णालयातही सिटी स्कॅनची यंत्रणा सुरू झाली. मात्र, अत्याधुनिक रेडिओ डायग्नोस्टिक विभाग सुरू करण्याचे गाजर दाखवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातील सिटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविण्याचा घाट घातला. त्यानुसार ते कऱ्हाडला गेलेही. दरम्यानच्या काळात शासन बदलले. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील रुग्ण सिटी स्कॅन यंत्रणेच्या सुविधेपासून वंचित आहेत. 

साताऱ्यातून मोठा महामार्ग जातो. या ठिकाणांवरील अपघातग्रस्त तसेच इतर राज्य मार्गावरील अपघातातील गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. इतर आजारातील रुग्णांनाही या सुविधेची गरज असते. मात्र, सिटी स्कॅन मशिन नसल्याने जखमी रुग्णाला दुसरीकडे हलवावे लागते. त्यामुळे तपासणी अहवाल येईपर्यंत रुग्ण उपचारापासून वंचित राहतो. अनेकदा जखमी रुग्णाचे नातेवाईक उपलब्ध नसतात, काहींकडे खासगीमध्ये भरायचे शुल्कही नसते. त्यामुळेही रुग्णावर होणाऱ्या उपचारांना वेळ लागतो. 

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सिटी स्कॅन मशिन देण्याची मागणी आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. त्या संदर्भात एक महिना किंवा दोन महिन्यांत यंत्र मिळेल, अशी आश्‍वासने मिळाली. मात्र, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. डॉ. श्रीकांत भोई यांनी एक महिन्यात ही सुविधा सुरू होईल, असे सांगितले होते. मात्र, त्याला चार महिने उलटून गेलेत. 

शस्त्रक्रिया विभागातही सुविधांची वानवा 
सिटी स्कॅन सुविधेबरोबरच एक्‍सरेसाठीही अत्याधुनिक मशिनची आवश्‍यकता आहे. जिल्हा रुग्णालयात होणाऱ्या एक्‍सरेवर योग्य निदान होत नाही, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. शस्त्रक्रिया विभागातही अत्याधुनिक उपकरणांची कमतरता आहे. सोनाग्राफीसाठी वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध नसतात. ओडिओ मीटरचे मशिन वारंवार बंद पडते. सध्याही ते नादुरुस्तच आहे. या सर्व परिस्थितीमुळे रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळत नाहीत. 

Web Title: Need City Scan Machine in Civil hospital