#ShahuMaharajJayanti : शाहू महाराजांच्या आदर्श विचारांची गरज

#ShahuMaharajJayanti : शाहू महाराजांच्या आदर्श विचारांची गरज

कोल्हापूर -  एखाद्या उच्चपदस्थाचा दौरा म्हणजे त्याच्याशी संबंधित अनेक जणांची अक्षरश: धावपळ असते. दौरा व्यवस्थित व्हावा, दौऱ्यातील सोयी-सुविधांबद्दल उच्चपदस्थ समाधानी व्हावा, म्हणून सगळी ‘ताकद’ वापरली जाते. उच्चपदस्थांचा दौरा होतो; पण त्याचा फटका अनेकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बसतो आणि तो फटका निमूटपणे सहन करावा लागतो... पण आपल्या दौऱ्याचा त्रास यत्किंचितही इतरांना होऊ नये. आपल्या दौऱ्याचा बोजा सामान्य नागरिकांवर पडू नये, म्हणून दौऱ्याआधी खास आदेश काढणारा एक राजा कोल्हापुरात होऊन गेला. दौऱ्यात राजासाठी भाजीची एक पेंढी घेतली, तरी जागेवर त्या भाजीवाल्याला किंवा शेतकऱ्याला पैसा चुकता झाला पाहिजे, असा आदेश देणारा हा राजा त्याची वेगळी ओळख ठेवून गेला. हा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. आज त्यांची जयंती आहे आणि राज्यकर्ता म्हणून त्यांच्या या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीची नव्या पिढीला जयंतीच्या निमित्ताने ओळख करून देण्याची गरज आहे. 

मंत्री, अधिकारी व अन्य उच्चपदस्थांचे दौरे ही प्रशासनाची जरूर गरज आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी उच्चपदस्थांनी जाणे आवश्‍यकच आहे; पण बहुतेक दौरे पाहिले, तर चार आण्यांची कोंबडी आणि बारा आण्यांचा मसाला, असे त्याचे स्वरूप आहे. प्रवास, वाहनांचा ताफा, निवासस्थान, खाणे-पिणे, देवदर्शन, स्थलदर्शन याचा खर्च मोठा आहे. अर्थात त्याचा भार प्रशासनावर किंवा मंत्री, अधिकारी ज्या खात्याचा, त्या खात्यावर आहे. सर्किट हाऊसला तर एक तलाठी निव्वळ उच्चपदस्थ व त्यांच्यासोबत आलेल्यांना काय हवे,  काय नको, एवढेच तो पहात असतो. किंबहुना त्याच ड्यूटीसाठी तो तलाठी नेमलेला असतो. 

या पार्श्‍वभूमीवर शाहू राजांसारखा एक द्रष्टा राजा खूप वेगळा राज्यकारभार करून गेला. त्यांनी त्यांच्या दौऱ्याचा डामडौल रोखण्यासाठी स्वत: काही नियम घालून घेतले होते. १४ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी काढलेल्या आदेशानुसार त्यांनी खूप मुद्देसूद अशा सूचना सर्व विभागांना दिल्या होत्या. त्यातही काही सूचना खूप बोलक्‍या व आजही उच्चपदस्थांच्या दौऱ्याला लागू होणाऱ्या आहेत. 

या सूचनांत त्यांनी म्हटले आहे की, ‘आमचा मुक्काम जिथे पडतो, तेथील मामलेदार, फौजदारास आमच्या सरबराईतून हुकूम करतो. फौजदार पोलिसांना हे काम सांगतो. मग पोलिस आजूबाजूच्या गावातून अंडी, कोंबडी, दूध, भाजीपाला, इतर साहित्य घेतात. नंतर त्याचा हिशेब होतो; पण ज्याच्याकडून साहित्य घेतले, त्याच्यापर्यंत त्याचा मोबदला पोहोचतो की नाही, याबद्दल शंका येते. त्यामुळे ज्याच्याकडून जो माल घेतला त्या गोरगरिबास तत्काळ पैसे द्यावेत. आजच्या दौऱ्याचा त्रास इतरांना होऊ नये.’

यासंदर्भात आदेशात असेही म्हटले आहे, की दौऱ्याचे साहित्य जमा करण्याची जबाबदारी पोलिस शिपायावर कधीही सोपवू नये. जेथे अडचण असेल तेथेच दौऱ्यात पोलिसांची मदत घ्यावी. दौऱ्याआधी सर्व आवश्‍यक साहित्य खरेदी करण्याची जबाबदारी एका कर्मचाऱ्यावर सोपवावी. खरेदीचे पैसे जाग्यावर रोख द्यावेत. पैसे पोहोचल्याची सही घ्यावी. दौऱ्यात दूध खरेदी करताना दुधाचा जो दर गावात असेल त्याच दराने दूध घ्यावे. त्याचे रोख पैसे द्यावेत. दौऱ्यात सोबत जे लोक असतील त्यांनीही कोणतीही वस्तू मोफत घेऊ नये व विशेष हे की, दौरा संपल्यानंतर बिले न देता दौरा संपल्यापूर्वी सर्व बिले आदा करावीत. करवीर सरकारच्या गॅझेट भाग एकमध्ये हा मूळ आदेश आहे. हा आदेश म्हणजे प्रशासनासाठी एक मौल्यवान दस्ताऐवज आहे. 

शाहूंची वेगळी ओळख करून देण्याची गरज
आताच्या दौऱ्यांचे स्वरूप, त्याचा डामडौल व उच्चपदस्थांबरोबर आलेल्या इतर व्यक्तींचे रुबाब पहाता शाहू महाराजांसारख्या राजाचे दौरे देशातील प्रशासनाला एक आदर्श आहेत; पण भपकेबाजपणा असल्याशिवाय उच्चपदस्थांचे दौरेच पूर्ण होत नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. त्यासाठी नव्या पिढीला शाहू महाराजांची ही आदर्श आगळीवेगळी ओळख पुन्हा पुन्हा करून देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com