महात्मा गांधींचे विचार समजून घ्या : शिवाजी राऊत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

खटावला एम. आर. शिंदे स्मृतिदिनानिमित्त शिवाजी राऊत यांचे व्याख्यान झाले.

खटाव (जि. सातारा) :  महात्मा गांधी यांचे विचार समजून घेणे, सध्याच्या काळात अत्यंत जरुरी आहे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते शिवाजी राऊत यांनी व्यक्‍त केले.
 
येथील माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त "आजच्या काळासाठी महात्मा गांधीजींची आवश्‍यकता' या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय कार्यकर्ते जीवन इंगळे होते. या प्रसंगी प्राचार्य रामचंद्र कोरडे, सिनेकलावंत तेजपाल वाघ, भूजलतज्ञ विलास भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
राऊत म्हणाले, ""महात्मा गांधींनी कुठल्याही धर्माचा किंवा भाषेचा द्वेष केला नाही. स्वातंत्र्य आंदोलनात व आधुनिक भारत घडविताना गांधींनी सर्व धर्म, भाषा, जाती, प्रांत व वंशातील स्त्री- पुरुषांना या प्रयत्नात सहभागी करुन घेतले. त्याचप्रमाणे एकात्म भारत घडवण्याचा प्रयत्न केला. आज जगातील 26 राष्ट्रांना भाकरी हवी आहे. हिंसा नको; अहिंसा हवी आहे. शांती व अहिंसेचे पूजारी एकमेव महात्मा गांधी आहेत. हे आता जगाने मान्य केले आहे.''
 
जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते यांनी प्रास्तविक केले. पत्रकार अविनाश कदम यांनी स्वागत केले. तेजपाल वाघ यांनी सूत्रसंचालन केले. संजय शहा यांनी आभार मानले. याप्रसंगी विजय बोर्गे- पाटील, ऍड. एम. ए. काझी, दिलीप जोशी, प्रा. सी. डी. पवार, प्रा. प्रवीण शेंडे, मोहन घाडगे, राजेंद्र काळे, तानाजी कुंभार, दिलीप जाधव, किशोर कुदळे, वैभव वाघ, युवराज शिंदे, रमेश शिंदे, राजू भोसले व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार सी. एन. शहा यांना आदरांजली वाहण्यात आली.

जलदूतांचा गौरव
 
जलसंधारणात उल्लेखनीय काम केलेल्या डिस्कळ, शिंदेवाडी व काळेवाडी ग्रामस्थांचा स्मृतिचिन्ह, पुस्तके व झाडांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी डिस्कळचे सरपंच डॉ.महेश पवार, आनंदा कर्णे, विनोद पवार, नितीन भुजबळ, पृथ्वीराज लाड, शिंदेवाडीचे तानाजी फाळके, शरद फाळके, विश्वास फाळके, शिवाजी फाळके, अनिल पवार, काळेवाडीचे सरपंच विनायक काळे, ज्ञानदेव काळे, लक्ष्मण काळे, अशोक जाधव, राहुल काळे, स्वप्निल काळे आदींचा गौरव करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need to understand the thoughts of Mahatma Gandhi says Shivaji Raut