समलिंगी संबंधाच्या त्रासातून भाच्याने केला मामाचा खात्मा ; लाेणावळ्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

पाेलिस निरीक्षक सज्जन हंकारे तपास करीत आहेत. संबंधित आराेपीस मामाकडून समलिंगी संबंध ठेवण्याचा सातत्याने आग्रह धरला जात हाेता असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
 

सातारा : नागेवाडी (ता. सातारा) येथील खिंडीमध्ये असलेल्या स्टोन क्रशरवरील परप्रांतीय कामगाराचा साेमवारी (ता. 11) रात्री खून झाला. या प्रकरणी संशयावरून मृताच्या भाच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डब्ल्यू कुमार रामसुंदरसिंह (वय 38, रा. पटणा, बिहार) असे मृत कामगाराचे नाव आहे, तर कन्हया (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या त्याच्या भाच्याचे नाव आहे.
 
याबाबत स्टोन क्रशरचे व्यवस्थापक शरद तानाजी मोरे (रा. कोडोली) यांनी फिर्याद नोंदविली आहे. नागेवाडी येथील खिंडीमध्ये घोरपडे स्टोन क्रशर आहे. तेथे पाच कामगार काम करतात. त्यामध्ये डब्ल्यू कुमारही होता. क्रशरजवळील एका शेडमध्ये तो राहात होता.

इतर कामगार काम संपल्यावर घरी जातात. काही दिवसांपूर्वी डब्ल्यू कुमारचा भाचा कन्हया हा त्याच्याकडे राहण्यास आला होता. सायंकाळी काम संपल्यानंतर इतर कामगार घरी गेले, तर डब्ल्यू कुमार हा शेडवर गेला होता. सकाळी मोरे यांना स्टोन क्रशरवरून एकाने क्रशरजवळ मृतदेह पडला असल्याची माहिती फोनवरून दिली.

माहिती मिळाल्यावर ते तातडीने क्रशरवर गेले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. त्या वेळी तो डब्ल्यू कुमारचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या डोक्‍यात, पायावर, तसेच तोंडावर गंभीर वार केलेले होते.

याबाबतची माहिती त्यांनी सातारा तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर मोरे यांची फिर्याद घेण्यात आली. डब्ल्यू कुमारचा भाचा हा सकाळपासून कुठेही आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यानेच खून केला असल्याचा संशय मोरे यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार कन्हय्यावर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आज (बुधवार) या प्रकरणी संबंधित आराेपीस तालुका पाेलिसांनी लाेणावळा येथे आटक केली आहे. पाेलिस निरीक्षक सज्जन हंकारे अधिक तपास करीत आहेत. संबंधित आराेपीस मामाकडून समलिंगी संबंध ठेवण्याचा आग्रह धरला जात हाेता असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nehew Killed Mama As Demand OF homosexuality