फक्त बोला, मोकळे व्हा! ; येथे साठलेल्या भावना व्यक्त करा, प्रतिकच्या अनोख्या फलकाची होतीय चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

मन मोकळं करून दिवसाची सुरवात करण्यासाठी रवाणा होतात. 

सांगली : सांगलीतील महावीर उद्यान तथा बापट मळ्याच्या प्रवेशद्वारावरच दररोज सकाळी सात ते नऊ या वेळेत प्रतिक कांबळे एक फलक घेऊन उभा असतो. येथे साठलेल्या भावना व्यक्त करा. फक्त बोला, मोकळे व्हा असं त्या फलाकावर आवाहन असते. अबालवृध्द प्रतिकला भेटतात. आपल्या भावना मांडतात. मन मोकळं करून दिवसाची सुरवात करण्यासाठी रवाणा होतात. 

गेल्या पंधरा डिसेंबरपासून प्रतिकने हा उपक्रम सुरु केला आहे. यामागची भावना मांडताना तो म्हणाला, 'मनाचा कोंडमारा झाल्याने काय होतं याचा मी अनुभव घेतला आहे. काही चांगल्या लोकांमुळे मी त्यातून बाहेर पडलो. अशी वेळ इतरांवर नको म्हणून हा उपक्रम. रोज पाच ते पंधरा जण मला भेटतात. त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अडचणी मांडतात. मी त्यांना त्यांचे गाऱ्हाणे खासगीत राहील याची हमी देतो. ते कोणाजवळ मांडू शकत नाहीत असं एका अनोळखी व्यक्तीजवळ नक्की मांडू शकतात. आता सायंकाळी मुख्य गणपती मंदिराजवळही थांबतो. देवाच्या दारात व्यथा अडचणींने ग्रासलेले लोक तिथेही भेटतात.'

हेही वाचा - 3100 फूट उंचीवर असलेली चित्तथरारक मोहिम केली पूर्ण 

प्रतिक म्हणाला, 'आभासी संवाद, आभासी मित्र वाढले असताना जीवाभावाची माणसे मात्र कमी होत आहेत. जगच कुटुंब होत असताना हक्काचे कुटुंब मात्र अधिकाधिक छोटे होते. पार-कट्ट्यावरच्या गप्पा कमी होत आहेत. काही विश्‍वासाने सांगावे अशा जागा कमी होत आहेत. अशा काळात आपलं कोणी विश्‍वासाने ऐकतेय याचा अनेकांना आनंद होतो.

मी फार्मसीचा पदवीधर असल्याने औषधांबद्दल, वैद्यकीय उपचाराबद्दल प्राथमिक माहिती आहे. मी त्यासाठीही त्यांना सूचना करतो. शैक्षणिक मार्गदर्शनासाठीच्या वाटा सूचवतो. माझ्या आवाक्‍यातील असेल तर प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी मदतीचा शब्द देतो. अन्यथा शुभेच्छा देतो. लवकरच अन्य बागांच्या परिसरातही मी थांबणार आहे.' 

हेही वाचा -  मी, माझी पत्नी आणि वडील या अपघातामुळे धास्तावलो आहोत

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new activity of pratik kamble in sangli for morning walk people