चला मोकळ्या जागेत जिरवूया पाणी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

शहरात अनेक ठिकाणी शासकीय आणि खासगी जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागेवर चर मारून पाणी अडविल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचेल अशी संकल्पना निसर्गप्रेमी संघटनेच्यावतीने मांडण्यात येत आहे.

सोलापूर - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावांमध्ये श्रमदानातून खड्डे केल्याने लाखो लिटर पाणी जमिनीत मुरत असल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. हीच संकल्पना शहरातल्या मोकळ्या जागांमध्ये राबविण्यासाठी निसर्गप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. 

शहरात अनेक ठिकाणी शासकीय आणि खासगी जागा मोठ्या प्रमाणात आहेत. या जागेवर चर मारून पाणी अडविल्यास मोठ्या प्रमाणात पाणी साचेल अशी संकल्पना निसर्गप्रेमी संघटनेच्यावतीने मांडण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी होटगी रस्त्यावरील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्यावेळी निसर्गप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी वसतिगृह परिसरातील जागेत चर मारून पाणी जिरवण्याची संकल्पना अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसमोर मांडली. त्यानंतर वसतिगृह परिसरात पाच-सहा ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने चर मारण्यात आले आहे. 

शहरात गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. उतारावरून नाल्यात वाहून जाणारे पाणी आता जमिनीत मुरायला सुरवात झाल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 

होटगी रस्त्यावरील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात पाणी जिरवण्यासाठी खड्डे मारण्यात आले आहेत. खड्ड्यांमुळे आता तिथे पाणी जिरत आहे. सोलापूरकरांनी आपल्या परिसरातील मोकळ्या जागेत हा प्रयोग करून जमिनीत पाणी जिरवावे. 
- अॅड. सरोज बच्चूवार, निसर्गप्रेमी संघटना

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: A new idea for conservation of natural water by paani foundation