दालसाठी बाटलीचा तर चावलसाठी बटर पेपरचा वापर!

तात्या लांडगे
रविवार, 24 जून 2018

प्लास्टिक वापरल्याने दंड करण्याऐवजी सर्वप्रथम संबंधित व्यवसायिकाला वार्निंग देण्याची गरज आहे. परंतु, थेट दंड आकारला जात असल्याने बहुतांशी उद्योजकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याच्या भावना लघू उद्योजकांनी व्यक्‍त केल्या.
 

सोलापूर - प्लास्टिक बंदीचा सर्वाधिक फटका छोटे-मोठ्या उद्योजकांना बसला आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणाऱ्या व्यवसायावर विपरित परिणाम झाला असून व्यवसाय निम्म्याने कमी झाले आहेत. सोलापुरातील आसरा चौकातील दाल-चावल विक्रेत्या मोहम्मद हमीद शेख यांनी प्लास्टिक बंदीनंतर अनोखी शक्‍कल लढविली आहे. त्यांनी दालसाठी पाण्याच्या बाटलीचा तर चावलसाठी बटर पेपरचा वापर सुरू केलाय. 

पर्यावरणाच्यादृष्टीने प्लास्टिक बंदी करणे आवश्‍यकच आहे. परंतु, प्लॅस्टिक बंदी करण्यापूर्वी ज्या ठोस उपाययोजना करायला हव्या होत्या, त्याचा अभाव सध्या दिसून येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांसह, कापड दुकानदार, किराणा दुकानदार तसेच लहान-मोठ्या उद्योजकांमधून नाराजीचा सूर निघत आहे. मटन विक्रेते, हॉटेल व्यवसायिक, दाल-चावल विक्रेते, मिठाई विक्रेते यांच्यासह अन्य व्यावसायिकांचे प्लास्टिक बंदीमुळे मोठे नुकसान होत आहे. सध्या बाजारात प्लास्टिक बंदीमुळे व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरल्याने दंड करण्याऐवजी सर्वप्रथम संबंधित व्यवसायिकाला वार्निंग देण्याची गरज आहे. परंतु, थेट दंड आकारला जात असल्याने बहुतांशी उद्योजकांवर व्यवसाय बंद करण्याची वेळ आल्याच्या भावना लघू उद्योजकांनी व्यक्‍त केल्या. 

कापडी पिशव्याचे दर वाढले -
प्लास्टिक बंदीपूर्वी कापडी पिशव्यांचे दर आणि सध्याचे दर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. आता कापडी पिशव्याचे दर 10 ते 15 रुपयांवरुन 25 ते 60 रुपयांवर पोहचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वस्तू पिशव्यांएवेजी हातात आणाव्या लागत आहेत. 

लोकांच्या मागण्या... 
- संपूर्ण प्लास्टिक बंदीऐजवी टप्पे-टप्पे करावेत 
- छोट्या व्यवसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी 
- दंडाची रक्‍कम कमी करावी 
- प्लास्टिक बंदीनंतर आता ठोस पर्यायी व्यवस्था उभारावी 
- स्वस्तात पर्यायी वस्तू उपलब्ध व्हाव्यात 
- छोट्या व्यवसायिकांसाठी सरकारने काही सवलती द्याव्यात 
- थेट दंड न करता प्रथम ताकीद द्यावी

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: new idea of hawker after plastic ban in solapur