कोल्हापुरात एक नवी ‘डावी’ चळवळ

सुधाकर काशीद
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत डावऱ्या, चपण्या) मंडळींसाठी आहे. दैनंदिन कामात डाव्या हाताचा प्राधान्याने वापर करणारी ही मंडळी आहेत.

कोल्हापूर - कोल्हापुरात डावी चळवळ सक्रिय आहेच; पण आणखी एक नवी डावी चळवळ कोल्हापुरात उभी रहात आहे. आणि ही चळवळ फक्त डावखुऱ्या (कोल्हापुरी भाषेत डावऱ्या, चपण्या) मंडळींसाठी आहे. दैनंदिन कामात डाव्या हाताचा प्राधान्याने वापर करणारी ही मंडळी आहेत.

व्यवहारात उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के आहे; पण दहा टक्के अशी मंडळी आहेत, की ते लहानपणापासून डाव्या हाताचा वापर अतिशय लिलया करतात आणि ही मंडळी कुशलतेने डाव्या हाताचा वापर करून आपल्याकडे लक्ष वेधून घेतात. क्रिकेटमध्ये डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्याला किंवा डाव्या बाजूने फलंदाजी करणाऱ्याला त्यामुळेच घाबरतात. कारण यांच्या डाव्या हाताचा अंदाज लवकर येत नाही आणि त्यामुळे लक्ष विचलित झालेला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू, या डावखुऱ्यासमोर टिकाव धरू शकत नाही. 

हे डावखुरे लोक इतर सर्वसाधारण लोकांसारखीच आपली दैनंदिन कामे सहजपणे करत असतात; पण आपल्या डावखुरेपणामुळे इतरांचे लक्ष वेधून घेत असतात. कोल्हापुरातली अशी डावखुरी मंडळी विविध क्षेत्रांत पसरलेली आहेत. त्याचा या क्षणीचा आदर्श अमिताभ बच्चन व सचिन तेंडुलकर आहे. कारण हे दोघेही डावखुरे आहेत. 

कोल्हापुरात ही सर्व मंडळी एकत्र येणार आहेत. त्यामागे नवी ओळख, नवी मैत्री, नवे नाते हे तर कारण आहेच; पण डाव्या हाताची कलाकुसर, डाव्या हाताचा स्वयंपाक, डाव्या हाताने वाद्यसंगीत, डाव्या हाताचा खेळ, डाव्या हाताचा मैत्रीचा आधार या साऱ्याची जपणूक ते करणार आहेत. इतरांच्या दृष्टीने उजवा हात शुभ आहे तर या मंडळींच्या दृष्टीने डावा हात शुभ आहे. त्यामुळे ही मंडळी जेव्हा समारंभात डाव्या हाताने नारळ फोडतात. त्या वेळी त्यांच्याकडे रोखल्या जाणाऱ्या विचित्र नजरांची त्यांना सवय झाली आहे.

प्रसाद स्वीकारताना समोरच्याच्या समाधानासाठी डावा हात पुढे न करता उजवा हात पुढे करण्याची तडजोड त्यांनी स्वीकारली आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे म्हणजे डावखुरे का, याची फारशी शास्त्रीय माहिती या मंडळींना नाही. किंवा ती माहिती जाणून घेण्याचीही त्यांची फारशी इच्छा नाही. 

डावखुऱ्या मंडळींचा उजव्या बाजूचा मेंदू अधिक कार्यरत असतो, असे कोणी सांगितले तर असू शकेल, असे म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. आणि त्यांनी आपले डावखुरेपण छानपणे जपले आहे. या मंडळींची नुकतीच एक बैठक झाली. त्यात त्यांनी व्हॉटस्‌ ॲपद्वारे एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. सुधर्म वाझे व डॉ. गीता पिलीई यांनी त्यात पुढाकार घेतला आहे. 

डावखुऱ्या मंडळींचा उजवा मेंदू अधिक कार्यरत असतो. काही वेळा ही डावखुरी मंडळी उजव्या हाताचा वापरही काही कामात करू शकतात. मात्र, एखादे लहान मूल डावखुरे असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्या पालकांनी शक्‍यतो त्याला उजव्या हाताचा वापर करण्यास भाग पाडू नये. कारण हा काही शारीरिक दोष नाही. तो शरीरातील हालचालींचाच भाग आहे. 
- डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर,
मेंदू व मणका उपचार तज्ज्ञ

Web Title: A new left movement in Kolhapur