"या' शहरात महाविकास आघाडीचा सूर्योदयापूर्वीच "अस्त'

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

भाजपचेच उमेदवार विजयी होणार 

महापौर आणि उपमहापौरपदावर भाजपचेच उमेदवार विजयी होतील. भाजपच्या संख्याबळापेक्षा आठ ते दहा जादा मते मिळवून ते विजयी होतील. 
- विजयकुमार देशमुख, आमदार 
सोलापूर शहर उत्तर

सोलापूर ः महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेचा महापौर निवडून आणण्याचे नियोजन झाले. पण आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वीच तिचा "अस्त' झाला आहे. त्यामुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला असून, महापौर व उपमहापौरपदी त्यांचे उमेदवार सहज निवडून येतील अशी स्थिती आहे. 

हेही वाचा .... मूल दत्तक घ्यायचे आहे, अशी आहे प्रक्रिया 

विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल 
महापौरपदासाठी चार तर उपमहापौरपदासाठी तब्बल नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उपमहापौरपदासाठी नागेश वल्याळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकावले आहे. ते निवडणुकीस सहभागी होणार नाहीत, असा दावा केला जात असला तरी, ते उद्या माघार घेतील असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. महाविकास आघाडी एकत्रित आणण्याचा प्रयत्न गेल्या तीन चार दिवसांपासून सुरु होता. महाविकास आघाडीचाच महापौर होईल असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनीही केला. मात्र महाआघाडीतील सर्वाधिक सदस्य असलेल्या शिवसेनेतच फूट पडल्याचे निदर्शनास आल्याने आघाडी केवळ कागदावरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले. 

हेही वाचा... कोल्हापूरपेक्षा या गावात मटनाचा दर जादा 

एमआयएम राहणार तटस्थ 
या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा याबाबत एमआयएमच्या नगरसेवकांची बैठक झाली. तीत कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देता तटस्थ राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती गटनेते रियाज खरादी यांनी दिली. त्यामुळे महाआघाडीला मताधिक्‍क्‍य मिळण्याची आशा धूसर झाली आहे. एमआयएमचे आठ सदस्य तटस्थ राहतील, असे श्री. खरादी यांनी सांगितले. 

हे आवर्जून पहा.... सहल आणि निवडणुकीची तयारी (VIDEO)

 

भाजप नगरसेविकांची सहल 
भाजपच्या नगरसेविकांची सहल सातारा व पाचगणीला गेली होती. मंगळवारी दुपारी चार वाजता ते परतीच्या प्रवासाला निघाले असून, रात्री उशीरा पंढरपुरात पोचणार आहेत. त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम असून, बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सहलीला गेलेले सर्वजण महापालिकेत येणार आहेत.  

हेही वाचा... अन्यथा पाच वर्षे सरकार  टिकणार नाही

दाखल झालेले अर्ज 
महापौर ः श्रीकांचना यन्नम (भाजप), फिरदोस पटेल (कॉंग्रेस), सारिका पिसे (शिवसेना) आणि शहाजीदाबानो शेख (एमआयएम). 
उपमहापौर ः नागेश वल्याळ (भाजप), राजेश काळे (भाजप), तस्लीम शेख (एमआयएम), नरसिंग कोळी (कॉंग्रेस), अमोल शिंदे (शिवसेना), किसन जाधव (राष्ट्रवादी कॉंग्रेस), भारतसिंग बडुरवाले (शिवसेना), फिरदोस पटेल (कॉंग्रेस) व शहाजीदाबानो शेख (एमआयएम).  महाराष्ट्र 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about mayour election in solapur municipal corporation