'निळवंडे'चे पाणी दुष्काळी भागात नेणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

शिर्डी - 'निळवंडे धरणाचे पाणी पुढील दोन वर्षांत कालव्यांद्वारे दुष्काळी टापूत नेण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. मतदारसंघातील विकासकामांना गालबोट लावण्याचा काही मूठभर मंडळींचा खटाटोप जनता यशस्वी होऊ देणार नाही,'' असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे सांगितले. विखे पाटील यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त प्रवरानगर येथील धनंजयराव गाडगीळ सभागृहात आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

जलक्रांती व मोफत अपघात विमा या दोन महत्त्वाच्या योजना यशस्वी झाल्या आहेत. या वर्षभरात शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला शिधापत्रिका देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची घोषणा डॉ. सुजय विखे पाटील यांनी या वेळी केली.

Web Title: nilwande dam water drought area