निंबाळकर दांपत्याचा आगळा रौप्यमहोत्सव

- व्यंकटेश देशपांडे
गुरुवार, 2 मार्च 2017

फलटण - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तरडगाव गटातून संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि साखरवाडी गटातून त्यांच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक- निंबाळकर मताधिक्‍याने निवडून आल्या. या दांपत्याची जिल्हा परिषदेतील पंचवार्षिक वाटचाल रौप्यमहोत्सवी ठरणार असून, जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या इतिहासात सलग २० वर्षांपेक्षा अधिक काळ सदस्य म्हणून कार्यरत राहणाऱ्या या अनुभवी नाईक-निंबाळकर दांपत्याकडून निश्‍चितच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  

फलटण पंचायत समितीच्या सभापतिपदानंतर संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी १९९२ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रथम गिरवी गटातून निवडून येऊन जिल्हा परिषद सदस्य म्हणून वाटचालीस सुरवात केली.

तेव्हापासून बरड, कोळकी, साखरवाडी आणि गिरवी गटातून दोनदा अशा प्रकारे पाच वेळा म्हणजे सलग २५ वर्षे सदस्य म्हणून ते कार्यरत राहिले. यावर्षीच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तरडगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून मताधिक्‍य मिळविले आणि सहाव्यांदा जिल्हा परिषदेत जाण्याचा मान पटकावला. सदस्यपदी कार्यरत असताना त्यांनी अडीच वर्षे उपाध्यक्षपदही भूषविले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फलटण तालुक्‍यासह अन्य तालुक्‍यांनाही विकासाबाबत मार्गदर्शन व योजना राबविण्यासाठी त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली.  शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर या १९९७ मधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोळकी गटातून सदस्य म्हणून निवडून गेल्या. तेव्हापासून त्या सलग २० वर्षे हिंगणगाव, विडणी, तरडगाव गटातून मताधिक्‍याने निवडून आल्या आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत साखरवाडी गटातून विजय मिळवून त्यांनी आपल्या जिल्हा परिषदेतील सदस्यत्वाच्या रौप्यमहोत्सवाच्या दिशेने आगेकूच केली आहे. अनुभवी अशा या फलटणच्या राजघराण्यातील 
संजीवराजे आणि शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर या दांपत्याकडून पुढील पाच वर्षांत जिल्ह्याच्या विकासाची गती वाढावी, अशी अपेक्षा फलटणकर व्यक्त करीत आहेत.

Web Title: nimbalkar couple Especial Silver Jubilee