'त्या' बेपत्ता कोरोना रुग्णाचा मृतदेह ' मिशन'च्याच वार्डात.... 

अजित झळके | Wednesday, 5 August 2020

शोधासाठी पोलिस-प्रशासनाची तारांबळ 

मिरज (सांगली) : येथील मिशन रुग्णालयातून सायंकाळी बेपत्ता झालेल्या नव्वद वर्षीय वयोवृध्द कोरोना रुग्णाचा मृतदेह रुग्णालयाच्याच अन्य एका वॉर्डमध्ये आढळला. दरम्यान त्याच्या शोधासाठी पोलिसांसह संपुर्ण महसूल यंत्रणेची प्रचंड तारांबळ उडाली. 

याबाबतची पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी दिलेली माहिती अशीः

सायंकाळी साडेचारच्या सुमारास हा रुग्ण हॉस्पिटलच्या कोरोना वार्डमध्ये नसल्याचे दिसून आले. तातडीने रुग्णालय प्रशासनाने ही माहिती पोलिसांना दिली. रुग्णालयाच्या सर्व परिसराची नाकेबंदी करण्यात आली. मिरज-पंढरपूर रस्त्यासह शिवाजी स्टेडियमपर्यंत तसेच सांगली कुपवाडकडे जाणाऱ्या सर्व रस्त्याचीही नाकेबंदी केली. पोलिसांनी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली. या दरम्यानच रुग्णालय परिसरात मोठी पोलिस कुमक गोळा झाली. रूग्णाचा चौफेर शोध घेत असता रुग्णालय कर्मचाऱ्यांनाच रुग्ण जुन्या बर्न वॉर्डच्या एका अडगळीच्या जागेत पडल्याचे निदर्शनास आले.'' 

हेही वाचा- 63 हजार शेतकऱ्यांनी भरला 34 हजार हेक्‍टरवरील विमा -

ते म्हणाले,"संबंधित रुग्ण बाथरुमसाठी म्हणून खाटावरून निघाला. मात्र त्याला परत येता आले नसावे. तो चूकून दुसऱ्याच वार्डात गेला. कर्मचारी मात्र त्याची वाट पहात बसले. आम्हीच रुग्णालय कर्मचाऱ्यांना अन्य सर्व वार्डांमध्ये शोध घेण्यास सांगितले असता बंद अवस्थेत असलेल्या अडगळीतील जुन्या बर्न वार्डमध्ये त्याचा मृतदेह आढळला. रुग्णाची स्थिती अत्यवस्थ होती. याबाबत चौकशी सुरु आहे.'' 

हेही वाचा- चांदोली धरण परिसरात मुसळधार; आजअखेर 1049 मिलीमीटर पाऊस -
दरम्यान रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती समजताच प्रांताधिकारी समीर शिंगटे, पोलीस उपअधीक्षक संदीप सिंह गिल, तहसीलदार रणजित देसाई, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील असा अधिकाऱ्यांचा ताफा काही मिनिटात रुग्णालयात दाखल झाला. रुग्णालयाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी या तयारीचा रात्री आढावा घेतला. 

संपादन - अर्चना बनगे