निपाणी : डोंगरी भागात वणवे लागले पेटू!

निपाणी, चिक्कोडी तालुक्यातील चित्र : जैवविविधतेला धोका
 उन्हाळ्यामध्ये अशाप्रकारे डोंगराळ भागाला आगी लागत आहेत.
उन्हाळ्यामध्ये अशाप्रकारे डोंगराळ भागाला आगी लागत आहेत.sakal

निपाणी : वनसंपदेने नटलेल्या निपाणी आणि चिक्कोडी तालुक्यात वणवे पेटू लागले आहेत. उन्हाळ्यात लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदेचे मोठे नुकसान होत आहे. या आगींमुळे वनांचा -हास होत असून पर्यावरणास बाधा पोहोचत आहे. त्यामुळे जंगलातील जैवविविधता संपून पक्षी, प्राणी, कीटक व वन्यप्राणी यांची जीवितहानी होऊन त्यांना लागणारी अन्नसाखळी नष्ट होत आहे.

साधारणपणे फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान ऐन उन्हाच्या तडाख्यात वणवे लागण्यास सुरवात होते. नैसर्गिक व मानवी हस्तक्षेपामुळे लागणाऱ्या वणव्यामुळे वनसंपदेचा बळी जात आहे. आठवड्यापूर्वी चिक्कोडीजवळील नागरमुन्नोळी पठारावर आग लागली होती. त्यात पठारासह शेजारील डोंगर रांगावरील सुमारे २० एकरांपेक्षा जास्त क्षेत्र जळाले. या ठिकाणची झाडे, झुडपे, गवत चाऱ्यासह सरपटणारे प्राणी खाक झाले. तर निपाणी भागातही काही गावच्या हद्दीवरील डोंगरास आग लागल्याने खासगीसह सरकारी गायरानामधील अनेक एकरचा परिसर खाक झाला.

अनेकवेळा वनक्षेत्रालगत शेतामध्ये शेतीची कामे करताना कचरा पेटवणे, गवत चांगले येण्यासाठी अशा प्रकारे स्थानिक नागरिकांकडून जाणीवपूर्वक आगी लावल्या जातात. अशा वनव्यामुळे पर्यावरणास बाधा पोहोचत आहे. जंगलातील पाला-पाचोळा पर्यावरणाला पूरक असतो. त्याच्या आधारे किटक व सरपटणारे प्राणीवास्तव्य करतात. तर गवत व पाला-पाचोळा जमिनीची धूप थांबविण्याचे तर पावसाळ्यात पाणी शोषून घेण्याचे फार मोठे काम करत असतो. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने डोंगराळ भागाचे संरक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे.

वणव्यामुळे दुर्मिळ वनसंपदा नष्ट

वणव्यामुळे अनेक दुर्मिळ झाडे, वनौषधी व वनसंपदा नष्ट होत आहे. वर्षानुवर्षे अनेक वेळा अशा प्रकारचे वणवे पेटत असतात. मात्र वनविभागाकडून याची दखल न घेता ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. याकडे वेळीच लक्ष दिले तर वनसंपदा, वन्यजीव वाचवू शकतो. यासाठी वनखात्याकडून ठोस उपाय योजना होणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com