निपाणीत विजेच्या गडगडाटासह पाऊस; गणेशोत्सव मंडळांची तारांबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raine

निपाणीत विजेच्या गडगडाटासह पाऊस; गणेशोत्सव मंडळांची तारांबळ

निपाणी : गेल्या आठवड्यापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानकच विजेच्या गडगडाटासह हजेरी लावल्याने सर्वसामान्य नागरिकांची त्रैधातिरपीट उडाली. तर एक दिवसावर असलेल्या गणेशोत्सव मंडळांची मात्र मोठी पंचायत होऊन तारांबळ उडाली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची मंगळवारी दिवसभर खरेदीसाठी गर्दी झाली होती. मात्र सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने त्यांनाही पळता भुई थोडी झाली.

गेल्या आठवड्यापासून निपाणी शहर आणि ग्रामीण भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. त्यामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडप घालण्यासह सजावटीची कामे पूर्ण केली आहेत. मात्र आगमनाच्या आदल्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची मात्र मोठी गैरसोय झाली. सायंकाळी आलेला पाऊस सुमारे तासभर झाल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचे लोट वाहत होते. तर काही मंडळामध्ये गटारी व इतर रस्त्यावरील पाणी वाहून गेल्याने त्यांना स्वच्छतेची कामे करावी लागली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहरात विविध ठिकाणी फळे व सजावटीच्या साहित्याचे दुकाने लागली होती. पण सायंकाळी पाऊस आल्याने खरेदी-विक्रीवरही मोठा परिणाम झाला. एकंदरीत या पावसामुळे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मात्र तारांबळ उडाल्याचे चित्र निपाणी शहरात दिसत होते.

Web Title: Nipani Rain Moderate Thunder Ganeshotsav Mandals Star

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..