राजांचा वाद ही भाजपची रणनीती?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

रामराजे, शिवेंद्रराजेंना युती खुणावतेय?
सत्ता कोणत्याही पक्षाची असू देत रामराजे नाईक-निंबाळकर हे आजपर्यंत मंत्री राहिले आहेत. आता राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा राज्यात येईल का, याची खात्री नसल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना भाजप, शिवसेना खुणावू लागली आहे. किमान एखादे मंत्रिपद तरी पदरात पडेल, या आशेने ही मंडळी पक्ष बदलाच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांना काहीतरी ठोस कारण हवे आहे. नीरा-देवघरच्या निमित्ताने सुरू झालेला पाणी संघर्ष पक्षांतराचे कारण ठरणार आहे. त्यामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीत राहणार का, हा प्रश्‍न आता महत्त्वाचा आहे.

सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आक्रमकपणे टीका करत आहेत. पाणीप्रश्‍नावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांत भांडण लावून भाजपचे नेते आगामी विधानसभेची रणनीती यशस्वी करण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना, असा प्रश्‍न आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील नेत्यांमध्ये सुरू असलेले वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. पण, पक्षातील आमदारांचा विरोध असूनही उदयनराजेंना खासदारकीचे तिकीट दिले आणि त्यांना पक्षासाठी सर्वांनी निवडूनही आणले. पण, त्यासाठी आपापसातील वाद, मतभेद विसरून सर्वजण एकत्र आल्याचे दाखविले. प्रत्यक्षात रामराजे-उदयनराजे तसेच उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे यांचे मनोमिलन किती फसवे होते, हे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आता समजले आहे. नीरा-देवघरचा प्रश्‍न भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पुढे आणला. त्यासाठी त्यांना मुख्यमंत्र्यांसह जलसंपदामंत्र्यांची साथ मिळाली. पण, हा मुद्दा खासदार झाल्यावरच उकरून काढण्यामागे रणजितसिंहांना भाजपच्या मंत्र्यांची साथ होती. या प्रकरणात आपले पारंपरिक विरोधक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अडकतात, हे जाणूनच त्यांनी हा मुद्दा पुढे आणला. सुरवात रामराजेंपासून झाली असली तरी वाद राष्ट्रवादीच्या नेत्यांत लागला आहे. भाजपने रणजितसिंहांच्या माध्यमातून राष्ट्रवादीत ठिणगी टाकली आहे.

यानिमित्ताने लोकसभा निवडणुकीत मिटलेला रामराजे, उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजेंतील वाद पुन्हा सुरू झाला आहे. थेट शरद पवारांच्या पुढ्यात दोन राजे एकमेकांशी भिडले. उदयनराजेंनी तर संतप्त होत जीभ हासडण्याचा इशारा दिला. पुन्हा एकदा रामराजे व उदयनराजे एकेरीवर आले आहेत. शरद पवारांचीही मध्यस्थी या दोघांनी झुगारली आहे. त्यामुळे आता हा वाद असाच पुढे सुरू राहणार आहे. यातून जनतेची करमणूक होत असली तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची अस्ताकडे वाटचाल होण्याच्या दृष्टीने पावले पडण्यास सुरवात झाली आहे. नेत्यांच्या या खालच्या पातळीवरील टीका-टिप्पणीतून पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काय बोध घ्यायचा, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांतील या भांडणामुळे कार्यकर्ते सैरभैर होणार आहेत. तर राष्ट्रवादीत वाद लावून भाजपने आपली आगामी विधानसभेसाठीची रणनीती यशस्वी करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. रामराजे-उदयराजेंच्या वादात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे हेही ओढले गेले आहेत.

ज्यांच्या जिवावर पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे, तेच नेते आता एकमेकांवर टीका करत वाभाडे काढण्यापर्यंत मजल गेली आहे. हा वाद आगामी काळात राष्ट्रवादीची शकले करण्यास कारणीभूत ठरणार आहे.

यासाठीच काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा भाजपकडून हत्यार म्हणूनच वापर होतो आहे. हे सर्वजण जाणत असले तरी परिणामांची कोणालाही काळजी नाही. मुळात खासदार रणजितसिंह आणि आमदार गोरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे शिष्य आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीला संपविण्याचा प्रयत्न केला. पण, जिल्ह्यातील राष्ट्रवादी संपविण्याऐवजी त्यांची काँग्रेसच संपत चालली आहे. आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक आमदार आपापले अस्तित्व राखून आहे.

अशा परिस्थितीत पक्ष व त्याची ध्येय-धोरणे याकडे लक्ष देण्यास कोणालाही वेळ नाही. पाण्यावरून संघर्ष होईल, किंबहुना आगामी काळात पाण्यासाठी युद्धे होतील, असे हीच नेतेमंडळी आपल्या भाषणात सांगतात. पण, प्रत्यक्षात तेही पाणी प्रश्‍नाच्या वादांत रंगले आहेत. 

सातारा जिल्ह्यातील पाणी हे इतर जिल्ह्यांना देण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील कोणीही तहानलेला राहू नये, याची काळजी याच नेत्यांनी घेणे गरजेचे होते. पण, यामध्ये कोणाची तरी शाब्बासकी मिळविण्यासाठी काहींनी घेतलेले निर्णय जिल्ह्याला दुष्काळाच्या खाईत लोटणारे ठरले आहेत. पाणी प्रश्‍नावरून सर्वांनीच वाद घालण्यास सुरवात केली तर जनतेने पाणी कोणाकडे मागायचे, हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो आहे. त्यामुळे पाणी प्रश्‍नावरून झगडून एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा जनतेला पाणी मिळण्यासाठी सर्वांनी शासन व प्रशासनाशी झगडावे, अशी अपेक्षा दुष्काळी जनतेतून व्यक्त होऊ लागली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nira Devghar Water Issue Udayanraje Bhosale NCP Sharad Pawar BJP Politics