नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली, अकलूजच्या किल्ल्याजवळील बंधारा पाण्याखाली

Nira River
Nira River

अकलूज : अकलूज आणि परिसरात पावसाने दडी मारली असली तरी येथून जाणारी नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची झळ सोसणाऱ्या अकलूजकरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरलेला दिसत आहे. वीर धरणातून 32 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीत करण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत असला तरी, वीर, भाटघर आणि उजनी धरणाच्या सुधारलेल्या स्थितीमुळे जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

उजनीच्या वरील भागातील धरणांची स्थिती सुधारल्यामुळे तेथून येणाऱ्या विसर्गातून उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. त्यामुळे शेतकरी, साखर कारखाने, नदीवरील व उचल पाण्याच्या योजनांना दिलासा मिळू लागला आहे. नीरा नदीवरील धरणांची स्थिती सुधारल्यामुळे डाव्या व उजव्या कालव्यातून आवर्तन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने रविवार (दि.28) पासून नदीत पाणी सोडले आहे. धरणातील येवा लक्षात घेऊन मंगळवारी धरणाचे 2 ते 8 नंबरचे दरवाजेे 4 फूट उचलले होते. त्यातून 34 हजार 500 क्युसेक्सचा विसर्ग नदीत सुरू होता. बुधवारी पहाटे 5 वाजता त्यात 13533 क्युसेक्स पर्यंत घट केली होती. त्यानंतर आता नदीत 1480 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे.

निरेच्या पाण्याने भीमा काठावर दिलासा 
वीरमधून सोडलल्या पाण्यामुळे नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे. नीरा नदीत पाणी आल्यावर माळशिरस तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी आणि कूपनलिकांची पाणीपातळी सुधारते. त्यामुळे निरेच्या प्रवाहाप्रती सर्वच स्तरातून कृतज्ञतेची भावना व्यक्त होत आहे. संगम (ता. माळशिरस) येथे नीरा नदी भिमेला मिळत असल्यामुळे या पाण्याने संगमपासून पुढे भिमेचा प्रवाह सुरू झाला आहे. निरेचे हे पाणी भिमेवरील मिरे बंधाऱ्यात आल्याने बंद पडलेल्या महाळूंग-श्रीपूरच्या पाणीपुरवठा योजनेला संजीवनी मिळाली आहे. तर याच पाण्याने भिमाकाठावरील गावांना मोठा दिलासा दिला आहे.  

निरा खो-यातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती 
वीरमध्ये 95.68 टक्के पाणीसाठा होता. त्यातून डाव्या कालव्यातून 650, उजव्या कालव्यातून 1480 क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. भाटघरमध्ये 75.35 टक्के, गुंजवणीत 88.33 टक्के, तर देवधरमध्ये 78.91 टक्के पाणीसाठा झाला होता. आज (बुधवारी) सकाळी नीरा धरण साखळीत 39.226 टीएमसी म्हणजेच, 81.16 टक्के पाणी-संचय झाला आहे. गेल्यावर्षी या तारखेला या चार धरणात 41.209 टीएमसी म्हणजेच 85.27 टक्के पाणी होते. 

उजनीची स्थिती दिलासादायक 
तळ गाठलेल्या उजनीच्या यशवंत सागर जलाशयाची स्थिती गेल्या पाच- सहा दिवसात चांगलीच सुधारली आहे. बुधवारी दुपारी 12 वाजता उजनीत 10.39 टक्के पाणीसाठा झाला होता. यावेळी बंडगार्डन येथून 28 हजार 456 तर, दौंड येथून 6997 क्युसेक्सचा विसर्ग उजनीच्या दिशेने येत असल्यामुळे उजनीची स्थिती मजबूत होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com