निराधारांच्या शिक्षणासाठी "व्हॉट्‌सऍप' ग्रुपने जमविले दोन लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जुलै 2016

सुपे - पारनेर युवा विकास मंच या "व्हॉट्‌सऍप‘ ग्रुपच्या सदस्यांनी निराधार व आर्थिक गरज असणाऱ्या मुलांच्या शिक्षणासाठी सुमारे दोन लाख रुपये, काही साहित्य आणि शैक्षणिक वस्तू जमा केल्या आहेत. त्याचे वितरण येत्या सात ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. आर्थिक मदतीची मागणी करणारे 130 अर्ज या ग्रुपकडे दाखल झाले असून, त्यातील गरजूंना ही रक्कम व साहित्य देण्यात येणार आहे. 

पारनेर तालुक्‍यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्यांचा "व्हॉट्‌सऍप‘ ग्रुप बाबूराव कदम, ज्ञानेश्‍वर इंगळे, प्रवीण गायकवाड या तरुणांनी तयार केला. सध्या या ग्रुपचे सुमारे दोन हजार सदस्य आहेत. केवळ आर्थिक कारणामुळे ज्यांच्या शिक्षणात अडथळा येत आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचे या ग्रुपने ठरविले. त्यासाठी निधी जमा करण्यात आला. केवळ या ग्रुपच्या सदस्यांनाच मदतीचे आवाहन करण्यात आले. त्यानुसार आजअखेर सुमारे दोन लाखांहून अधिक रक्कम व काही साहित्यही ग्रुपकडे जमा झाले. 

या रकमेचे आणि साहित्याचे वाटप योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी एक समिती ग्रुपने स्थापन केली असून, त्यामार्फत गरजू विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 130 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांतील गरजूंची निवड या समितीमार्फत करण्यात येणार असून, त्यांना सात ऑगस्ट रोजी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे.
 
या ग्रुपने यापूर्वीही दोन गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली आहे. ज्या मुलांना शैक्षणिक मदत हवी आहे व ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे किंवा जे निराधार आहेत, त्यांनी 31 जुलैअखेर पारनेर येथील प्राथमिक शिक्षक बॅंकेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Niradhar education 'whats app' group assembled Rs two lakh