कर्नाटक एसआयटीप्रमाणे पानसरे, दाभोळकर हत्येचा महाराष्ट्राने तपास करावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

धर्मांध शक्तींना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. विवेक अभिव्यक्ति स्वातंत्र्य देखील आवश्यक आहेत. ज्यांना गजाआड घालायचे ते मोकाट फिरत आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.

- डाॅ. एन. डी. पाटील

कोल्हापूर - ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात आले होते. पानसरे यांच्या घरापासून मॉर्निंग वॉकला प्रारंभ झाला.

यामध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. एन. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर, मेघा पानसरे यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी डाॅ. एन. डी. पाटील यांनी सर्वांना शपथ दिली. कर्नाटक एसआयटीने तपास गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. तसा तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा, असे मत यावेळी मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले.

धर्मांध शक्तींना वेळीच आवर घालण्याची गरज आहे. विवेक अभिव्यक्ति स्वातंत्र्य देखील आवश्यक आहेत. ज्यांना गजाआड घालायचे ते मोकाट फिरत आहेत. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा.

- डाॅ. एन. डी. पाटील

सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर म्हणाल्या; गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास कर्नाटक एसआयटीने गतीने केला. त्यांच्या तपासामुळे दाभोळकर आणि पानसरे यांच्या हत्येतील काही महत्त्वाचे धागेदोरे हाती आले. तसा तपास महाराष्ट्र एसआयटीने करावा.  पानसरे, दाभोळकर यांच्या हत्येचा तपास निर्णायक टप्प्यावर आला आहे. तपास यंत्रणांनी अधिक गतीने तपास करून विवेकवाद यांची हत्या करण्याचा विचार मांडणाऱ्यांच्या मुळाशी गेले पाहिजे

कॉम्रेड पानसरे अमर रहे, आम्ही सारे पानसरे अशा घोषणा देत कार्यकर्ते मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉक मध्ये सहभागी झाले होते.

 दरम्यान, पानसरे यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी बुधवार (ता.२०) शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दुपारी ११ ते ४ या वेळेत बिंदू चौकात सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र निदर्शने केली जाणार आहेत.

सकाळी ११.३० वाजता पानसरे यांच्या तपासाबाबत संघर्ष समितीचे कार्यकर्ते पोलिस अधीक्षकांना निवेदन देणार आहेत. दुपारी ४ वाजता शाहू स्मारक येथे स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सुप्रसिद्ध लेखक, सिनेगीतकार, माजी खासदार जावेद अख्तर यांचे ‘२१ व्या शतकातील अंधार युग’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. जागर सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. आ. ह. साळुंखे यांची प्रमूख उपस्थिती असणार आहे. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन संघर्ष समितीने केले आहे.

 

Web Title: Nirbhaya Morning walk in memory of Govind Pansare