'जयंतराव, शहराची काळजी घ्यायला आम्ही सक्षम. बाहेरच्यांनी शिकवू नये..' - निशिकांत पाटील

धर्मवीर पाटील
गुरुवार, 18 जुलै 2019

इस्लामपूर - जयंतराव, आधी माहिती घ्या आणि मग बोला. शहराची काळजी घ्यायला नगरसेवक सक्षम आहेत, कुणी बाहेरच्याने येऊन आम्हाला शिकवायची गरज नाही, असा प्रतिहल्ला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज आमदार जयंत पाटील यांच्यावर केला.

इस्लामपूर - जयंतराव, आधी माहिती घ्या आणि मग बोला. शहराची काळजी घ्यायला नगरसेवक सक्षम आहेत, कुणी बाहेरच्याने येऊन आम्हाला शिकवायची गरज नाही, असा प्रतिहल्ला नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी आज आमदार जयंत पाटील यांच्यावर केला. साथीच्या रोगांचे राजकारण करण्याइतपत बौद्धिक घसरण तालुक्यातील जनतेला अपेक्षित नाही, असेही ते म्हणाले.

आमदार पाटील यांनी येथील एका प्रभागात आयोजित बैठकीत पालिका शहरातील आरोग्य, स्वच्छतेच्या मुद्यावर दुर्लक्ष करत असल्याची टीका केली होती. त्यावर नगराध्यक्षांनी आज पत्रकार परिषदेत तोंड सोडले.

ते म्हणाले, "गेल्या ३० वर्षातील नियोजनशून्य कारभाराचे परिणाम शहरातील जनता सोसत आहे. १५ वर्षे मंत्री आणि ३० वर्षे आमदार असणाऱ्या जयंत पाटील यांनी किमान डेंग्यूचे डास का व कसे निर्माण होतात याची माहिती घेऊन मगच आरोप करायला हवे होते. उपनगराध्यक्ष आणि आरोग्य सभापती राष्ट्रवादीचेच आहेत, किमान त्यांच्याशी संवाद साधला असता तर त्यांचे अज्ञानपण प्रकट झाले नसते. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. भविष्यात बोलताना त्यांनी किमान माहिती घ्यावी. गेली दोन दशके ते शहरात भुयारी गटार योजनेचे वचन देत होते. पण आमच्या सरकारने योजना मंजूर करून काम सुरू केले. २००८ - ०९ साली पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. त्याच वेळी १९८५ पूर्वीच्या सिमेंट पाईप यांनी बदलल्या असत्या तर आजचा नागरिकांचा त्रास कमी झाला असता."

ते म्हणाले, "आमची पालिका आणि आरोग्य विभाग योग्य त्या उपाययोजना करत आहे, भविष्यातही करेल. संमिश्र वातावरण आणि या काळात डासांची वाढणारी नैसर्गिक प्रजननक्षमता यामुळे साथीचे आजार वाढलेत. शहरात ९ ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळलेत. एकूण १४२ संशयित रुग्णांमध्ये ९० बरे झाले आहेत. तालुक्यातील १८ गावांमध्ये साथ आहे. ३० हजारपेक्षा जास्त माहितीपत्रके वाटप आणि अन्य उपाययोजना केल्या आहेत."

जयंत पाटील यांनी काय केले?
 "साडे सतरा हजार मताधिक्य ज्या शहराने दिले त्या शहरात साथीचे आजार आहेत म्हणून आपण आरोग्य विभागाची एखादी बैठक घेऊन आढावा घेतला का? मंत्री सदाभाऊ खोत यांनी आढावा बैठक घेतली, जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. मग यांनी काय केले?" असा सवाल निशिकांत पाटील यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nishikant Patil comment on Jayantrao Patil