कडेगाव नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या नीता देसाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

  • कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नीता देसाई
  • उपनगराध्यक्षपदी राजू उर्फ प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड
  • निवडीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटक्याची आतिषबाजी
     

कडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या नीता देसाई यांची तर उपनगराध्यक्षपदी राजू उर्फ प्रशांत जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटक्याची आतिषबाजी करून एकच जल्लोष केला.

नगरपंचायतीच्या अडीच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारत 17 पैकी 10 जागा जिंकत निर्विवाद विजय संपादन केले. त्यानंतर आकांक्षा जाधव यांची नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी साजिद पाटील यांची निवड झाली होती. या दोघांचाही  कार्यकाल अडीच वर्षांचा होता. तो पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नूतन नगराध्यक्ष निवडीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज यापदांसाठी निवडणूक झाली.

नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नीता देसाई व उपनगराध्यक्ष पदासाठी राजू उर्फ प्रशांत जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी मारुती बोरकर यांनी काम पाहिले.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटक्याची आतषबाजी करुन जल्लोष केला.

कडेगावला स्मार्ट सिटी बनवू

आमदार डॉ. विश्वजित कदम व शहरांतील पक्षाचे नेतेमंडळी व नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची संधी दिली. त्या संधीचे मी निश्चितच सोने करीन. डॉ. पतंगराव कदम यांची राजधानी असलेल्या या शहराचा चौफेर विकास करुन शहराला स्मार्ट सिटी बनवू.
- नीता देसाई,
नगराध्यक्षा,कडेगाव नगरपंचायत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nita Desai new Chairperson of Kadegaon