शिवसेना सांगली जिल्ह्यातील 'या' चार जागा लढविणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जून 2019

सांगली जिल्ह्यातील चार आमदार भाजपचे आहेत. अन्य चार जागांवर शिवसेना ताकदीने लढण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यात खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचाही समावेश आहे. त्यासाठी प्रभाग तिथे शिवसेना शाखेचा नव्या फॉर्म्युल्यानुसार 23 जुलैपर्यंत शाखा विस्तार होईल.

सांगली - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युतीचा पन्नास - पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे. राज्यातील 135 जागा दोघांच्या तर अन्य 18 जागांवर मित्रपक्ष लढतील. सांगली जिल्ह्यातील चार आमदार भाजपचे आहेत. अन्य चार जागांवर शिवसेना ताकदीने लढण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. त्यात खानापूरचे आमदार अनिल बाबर यांचाही समावेश आहे. त्यासाठी प्रभाग तिथे शिवसेना शाखेचा नव्या फॉर्म्युल्यानुसार 23 जुलैपर्यंत शाखा विस्तार होईल. अन्य तीन म्हणजे इस्लामपूर, कडेगाव - पलूस आणि तासगाव - कवठेमहांकाळमध्ये लढू अन्‌ जिंकूही, अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे - पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

कृष्णा खोर महामंडळाचे उपाध्यक्ष बानुगडे-पाटील यांच्या उपस्थितीत आज सिंचन योजनांबाबत शेतकऱ्यांसाठी तक्रार निवारण परिषद झाली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी जिल्हा प्रमुख संजय विभूते, माजी जिल्हाध्यक्ष बजरंग पाटील, शेखर माने आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले,""राज्यात लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेला फॉर्म्युला विधानसभेलाही कायम राहील. 288 विधानसभेच्या जागांपैकी सेना-भाजप प्रत्येक 135 जागा लढवेल. त्यात सेना- भाजपचे विद्यमान 130 आमदार, विखे-पाटील यांच्यासह नव्याने दाखल झालेल्या 4 आमदारांमुळे विद्यमान आमदारांचे मतदार संघ त्यांच्याकडेच राहतील. काही अपवादात्मक परिस्थितीत मतदार संघ बदलतील. अन्यथा अन्य सर्व म्हणजे 70 ते 74 मतदार संघात शिवसेनेला नव्याने संधी आहे.'' 

ते म्हणाले,""सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी चार ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. खानापुरात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर विधानसभेवर आहेत. अन्य इस्लामपूर, कडेगाव-पलूस आणि तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघात शिवसेना ताकदीने निवडणूक लढवणार आहे. शिवसेना वर्धापनदिनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गाव तिथे शाखा ऐवजी आता प्रभाग तिथे शाखेचा नारा दिला आहे. 23 जुलैपर्यंत राज्यभर त्यानुसार बांधणी केली जाणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व बीएलओ शिवसेनाच नेमू शकली होती. त्याच धर्तीवर विधानसभेचीही तयारी केली जाईल.'' 

बाबर यांना यापूर्वीच संधी द्यायला हवी होती 
शिवसेनेने आमदार अनिल बाबर यांनी सुधारित मंत्रिमंडळात स्थान न दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांबाबत विचारले असता बानुगडे-पाटील म्हणाले,""होय आम्ही त्यांना संधी देणे गरजेचे होते. मात्र ती पक्षाच्या धोरणाप्रमाणे मिळू शकलेली नाही. आमदार बाबर राष्ट्रवादीकडे असताना 20 वर्षांत यापूर्वीच त्यांनी संधी द्यावयास हवी होती.'' असे ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Banugade Patil comment in Press conference