सांगलीची चाके रुतलीत, गडकरीसाहेब धक्का द्या...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची ओळखच मुळी ‘रोडकरी’ अशी आहे. विकास रस्त्यावरून धावतो असं म्हणतात. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सांगलीच्या विकासाच्या गाडीचा वेग मात्र गेल्या तीन दशकांत अपेक्षित गतीने राहिला नाही. त्यामागच्या कारणांचा शोध घेता जिल्ह्याचे महामार्गातले मागासलेपण हे कारण ठळकपणे अधोरेखित होते. आता मात्र जिल्ह्यात एकाचवेळी एकूण तीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतेय. गडकरींसोबत आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हेही या योजनेचा नारळ  फोडणार आहेत. या दोघांकडे सांगलीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीचे हे गाऱ्हाणे...
 

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची ओळखच मुळी ‘रोडकरी’ अशी आहे. विकास रस्त्यावरून धावतो असं म्हणतात. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सांगलीच्या विकासाच्या गाडीचा वेग मात्र गेल्या तीन दशकांत अपेक्षित गतीने राहिला नाही. त्यामागच्या कारणांचा शोध घेता जिल्ह्याचे महामार्गातले मागासलेपण हे कारण ठळकपणे अधोरेखित होते. आता मात्र जिल्ह्यात एकाचवेळी एकूण तीन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होतेय. गडकरींसोबत आज राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील हेही या योजनेचा नारळ  फोडणार आहेत. या दोघांकडे सांगलीच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठीचे हे गाऱ्हाणे...

हवे स्वतंत्र बांधकाम परिमंडल
कोल्हापूर सर्कलमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश आहे. शेजारचा कधी काळी सांगलीचाच भाग असलेला सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्कल आहे. मग सांगलीवरच हा अन्याय का? स्वतंत्र सर्कलचे अनेक फायदे आपण कोल्हापूरबाबत पाहात असतो. असे स्वतंत्र सर्कल कोल्हापूर जिल्ह्याच्या फायद्याचेही आहे. दोन्ही जिल्ह्यांना निधी स्वतंत्रपणे मिळू शकतो. सध्या जयसिंपूर किंवा इचलकरंजीहून सांगलीला जोडणाऱ्या रस्त्यांवरील खर्चही सांगली जिल्ह्यावर झालेल्या खर्चात समाविष्ट होत असतो.
-डॉ. रोहित जाधव

सांगली-कोल्हापूर रस्ता प्रश्‍न सोडवा
सांगली-कोल्हापूर रस्ता हा पूर्वी खासगीकरणातून केला जात होता. सुमारे ८० काम झाल्यानंतर तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. हा विषय सध्या लवादाकडे नेण्यात आला असून त्याचा निर्णय होईपर्यंत काम रखडण्याची शक्‍यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रश्‍न तत्काळ निकाली काढावा. सांगली शहराच्या बाजूने चार महामार्ग जातात. पण, त्यापैकी एकही शहरात येत नसल्याने सांगलीकरांना त्याचा फायदा होणार नाही. रत्नागिरी-नागपूर महामार्ग अंकली (ता. मिरज) येथून जातो. तो अंकली येथून सांगली बस स्थानाकपर्यंत वाढवता येईल. 
- श्रीनिवास पाटील

अर्बन ॲग्लोमिरेशनमध्ये दुरुस्तीची आवश्‍यकता 
पाणी, जागा, लोकसंख्या अशा विविध निकषांवर परिसराची विकासाच्या क्षमतेचे मानांकन होत असते. अर्बन ॲग्लोमिरेशनही एक त्यापैकीच संज्ञा. एखाद्या शहर आणि त्याभोवतीची उपनगरे, गावे यांची एकत्रित लोकसंख्या गृहीत धरून होणारा परिसर म्हणजे त्या शहराचे अर्बन ॲग्लोमिरेशन. सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिका आणि माधवनगर ग्रामपंचायत एवढा परिसर सध्या सांगलीच्या ॲग्लोमिरेशनचा भाग आहे. खरे तर पुण्याचा दोन महापालिकांसह सुमारे चाळीस किलोमीटरचा परिसर अर्बन ॲग्लोमिरेशनचा भाग आहे. तेच कोल्हापूर बाबत आहे. सांगलीच्या अर्बन ॲग्लोमिरेशन परिसरात इचलकरंजी, कबनूर, जयसिंगपूर, शिरोळ, धामणी, आष्टा, तासगाव, बुधगाव, उगार खुर्द, शेडबाळ, आरग, सलगरे, हरिपूर, बेडग, डिग्रज, नांद्रे, भिलवडी, किर्लोस्करवाडी, पलूस, हजारवाडी, बिसूर, पद्माळे, बोलवाड, टाकळी, बामनोली, अंकली, इनाम धामणी, कर्नाळ, समडोळी, सावळज, तुंग, मिरजवाडी ही शहरे-गावांचा समावेश होऊ शकतो. सुमारे पंधरा लाख लोकसंख्येचा हा परिसर सांगलीची देशस्तरावरील गुंतवणूकदारांच्या यादीत पत वाढवू शकतो. त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला द्यायचे काहीच नाही. फक्त निर्णय करायचा आहे. 
- उमेश शहा

वाहनतळाचे भिजत घोंगडे
सांगलीतील वखारभागातील बायपास पुलालगतच्या सुमारे सतरा एकर परिसरात अद्ययावत अशा वाहनतळाचा  प्रकल्प आराखडा सध्या महापालिकेच्या कपाटांमध्ये धूळखात पडला आहे. साडेचार वर्षांपूर्वी सुमारे ३७ कोटींचा हा प्रकल्प आराखडा वाहतूक व्यावसायिक, केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी गडकरींना नागपूर भेटीत हा प्रस्ताव अवलोकनी आणला होता. आता महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने दिल्लीपर्यंतचा या प्रस्तावाचा प्रवास गतीने व्हावा ही अपेक्षा.
-बाळासाहेब कलशेट्टी, 
जिल्हाध्यक्ष, वाहतूकदार संघटना

अनास्था किती काळ?
सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांना वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांची कनेक्‍टिव्हिटी आहे, त्याबाबत समाधान  आहे, मात्र सांगली शहराला आजपर्यंत राष्ट्रीय महामार्गांची दुर्दैवाने कनेक्‍टिव्हिटी नाही. राजकीय दबदबा राज्यात, देशात असून उपयोग काय? सांगली (म्हैसाळ) ते पेठ राष्ट्रीय महामार्गत समाविष्ट होऊन एक वर्ष झाले. त्याची अवस्था भीक नको कुत्रे आवर झालीय. सांगली ते कोल्हापूर रस्ता गेल्या पाच वर्षांपासून चौपदरी होतोय. किती काळ काम लटकणार आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग मिरज शहरातून जाणार आहे, त्याची जर अवस्था बघितली तरी त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे कसे? गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्ग पलूस-पाचवा मैल-तासगाव पुढे मणेराजुरी, शिरढोनमार्गे जातो. तो मार्ग पाचवा मैलापासून सांगलीपर्यंत कनेक्‍ट करायला हवा. 
- सतीश साखळकर, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Nitin Gadkari on Sangli Tour special