"मन अन्‌ मनी' जाणणारा डॉक्‍टर 

"मन अन्‌ मनी' जाणणारा डॉक्‍टर 

सातारा - पती रिक्षाचालक, पत्नी मोलमजुरी करणारी... त्यात दोन्हीही मुले मतिमंद... एकाला फिट येण्याचा त्रास... स्वत:वरील नियंत्रण सुटल्याने शाळेतही कपडे काढणाऱ्या मुलाला "आशा भवन'मध्ये ऍडमिट करा, असे सांगत ते आई-वडील आले... मात्र, डॉक्‍टरांनी समजूत काढत औषधोपचार सुरू केले... पाच वर्षांनी आता आई खूष आहे, तर तो मुलगा डॉक्‍टरांना "मामा' अशी प्रेमाची हाक मारतो अन्‌ डॉक्‍टरांनाही चांगले वाटते. 

मनोविकारतज्ज्ञ नितीन रोकडे हे वैद्यकीय क्षेत्रातील नवखे नाव असले तरी सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी आपला नावलौकिक मिळविला आहे. एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2011 पासून प्रॅक्‍टीस सुरू केली. प्रारंभी चार वर्षे जिल्हा रुग्णालयात काम केले. स्वत:चे हॉस्पिटल सुरू केले असले तरीही ते जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची तपासणी करण्यास तत्पर असतात. रुग्ण तपासायचे असल्यास त्याला हॉस्पिटलमध्ये आणले पाहिजे, हा शिरस्ता पडला आहे. मात्र, त्याला ते थोडेफार अपवाद राहिले आहेत. असह्य वृद्ध मनोरुग्णांवर त्यांच्या घरी जाऊन उपचार करण्यात ते आनंद मानतात. 

वळसेतील एहसास मतिमंद मुलांची शाळेतील सुमारे 30 मुले, आनंद परिवाराच्या मतिमंद मुलांच्या शाळेतील दहा मुलांची वर्षातून दोनदा, आशा भवनमधील मुलांची आवश्‍यकता असेल तेव्हा ते मोफत तपासणी व औषधोपचार करतात. समता वृद्धाश्रमातील दहा लोकांची वर्षातून एकदा तर, केअर टेकर सेंटर वृद्धाश्रमातील 20 वृद्धांची 15 दिवसांतून ते एकदा तपासणी करतात. 

मनोविकार हे प्रामुख्याने जन्मजात अथवा परिस्थितीने उद्‌भवतो. अनेकदा अशा लोकांना उपचार करण्यास पैसेही नसतात. सामान्य कुटुंबातील मुले, वृद्ध तपासणीस आल्यास त्यांची तपासणी शुल्क निम्मीच घेणे, हा त्यांचा स्वभाव. "डॉक्‍टर मला मारून टाका, नाही तर बरे तरी करा,' अशी एका युवतीने रोकडे यांच्यासमोर व्यथा मांडली. अशा युवतीला धीर देण्यासाठी, त्यांचे विवाह व्यवस्थित, आपापसातील संमतीने जुळावेत, यासाठी ते नियोजित वरांनाही भेटतात आणि दोन्ही कुटुंबीयांचे समुपदेशन करतात. 

उपचाराची चतु:सूत्री 
चीडचीड, आरडाओरड, नैराश्‍य येणे आदी मनोविकार, त्याच स्मृतीभ्रंश यामुळे वयोवृध्दांचे जगणे खडतर होते. त्याचा घरातील व्यक्‍तींना त्रास वाटतो. मात्र, त्यांच्यावर कमीत कमी औषध, जास्तीत जास्त सहवास ही उपचार पद्धती असते. "हालचाल, साथ, संवाद, सन्मान' हीच त्यांच्यावरील उपचाराची एक चतु:सूत्री असून, वृध्दाश्रमात ते त्यावर भर देतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com