निवृत्ती चौकातील निवृत्ती होता कोण?

सुधाकर काशीद
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - गरम गरम वडा खायचा आहे, दावणगिरी डोशावर ताव मारायचा आहे, चला! निवृत्ती चौकात, सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्र जमायचं आहे आणि तेथून पुढे सुटायचं आहे. त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी निवृत्ती चौकात शिवाजी पेठेत जायचा मार्गही या चौकातूनच.

कोल्हापूर - गरम गरम वडा खायचा आहे, दावणगिरी डोशावर ताव मारायचा आहे, चला! निवृत्ती चौकात, सगळ्यांनी एका ठिकाणी एकत्र जमायचं आहे आणि तेथून पुढे सुटायचं आहे. त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी निवृत्ती चौकात शिवाजी पेठेत जायचा मार्गही या चौकातूनच. त्यामुळे हा चौक बारा तास वर्दळीचाच. निवृत्ती चौक हे नाव त्यामुळे या, ना त्या निमित्ताने प्रत्येकाच्या तोंडात; पण या चौकाला निवृत्ती हे नाव कशासाठी, असं विचारलं तर मात्र बहुतेकजण मौनात....पण आता ज्याच्या नावाने हा चौक आहे, त्या निवृत्तीचा इतिहास या चौकातच फलकाच्या रूपाने उभा केला जाणार आहे आणि या चौकाला निवृत्ती चौक का म्हणतात, हे नव्या पिढीला कळू शकणार आहे.

हे निवृत्ती आडुरकर (सुतार) म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अपरिचित हुतात्मा, स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर पुढे आणि शिवाजी पेठ तर याहून पुढे असे ठरूनच गेले होते. 

काही स्वातंत्र्यसैनिकांनी पन्हाळा येथे ब्रिटिश सैनिकांच्या पन्हाळा येथील छावणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात सहभाग म्हणून त्या वेळी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या निवृत्ती आडुरकर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहिती मिळवण्यासाठी अनन्वित छळ केला. असे सांगतात की, त्यांची जीभ हासडली गेली. (जीभ हसडणे म्हणजे एखाद्याची जीभ ताणून बाहेर ओढणे.) त्याचा खूप मोठा त्रास त्यांना भोगावा लागला; 

पण निवृत्ती आडुरकर यांच्याकडून माहिती न कळाल्याने त्यांना सोडून दिले; पण अनन्वित छळाने हाल-हाल झालेल्या निवृत्ती आडुरकर यांचा ९ ऑगस्ट १९४४ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे नाव शिवाजी पेठेची वेसच असलेल्या चौकास देण्यात आले व निवृत्ती चौक नावाने ते सर्वतोमुखी झाले. पुढे पुढे तर निवृत्ती चौक हे कोल्हापुरातील विविध घडामोडींचे मुख्य केंद्र बनले.

या साऱ्या वाटचालीत निवृत्ती नाव जरूर टिकले; पण निवृत्ती कोण ? हे मात्र विसरले गेले किंवा त्या इतिहासाचे पानच बाजूला पडत गेले. 

अर्धा शिवाजी पुतळा कोल्हापूरचे भूषण
या चौकातला शिवाजी महाराजांचा अर्धा पुतळा म्हणजे कोल्हापूरचे भूषण आहे. त्याच्या चबुतऱ्याचे नूतनीकरण काम आता सुरू आहे.  १५ ऑगस्ट १९४७ ला म्हणजे स्वातंत्र्य दिनालाच या चौकात हा पुतळा बसविण्यात आला आहे. 

कुटुंबीय शिवाजी पेठेत
निवृत्ती आडुरकर यांची मुलगी इचलकरंजीत आहे. इतर पुतणे व परिवार शिवाजी पेठेत बुवा चौकात राहतात. त्यांचे घर ज्या रस्त्यावर आहे, त्या रस्त्यास हुतात्मा निवृत्ती आडुरकर पथ असे नाव आहे.

गुरुवारी विविध कार्यक्रम
आता सुतार, लोहार समाज उन्नती संस्था गुरुवारी (ता. ९) निवृत्ती चौकाचा इतिहास या चौकात उभा करणार आहे. त्यानिमित्त रॅली, प्रतिमापूजन, फलक अनावरण होईल आणि निवृत्ती आडुरकरांच्या हौतात्म्याचा इतिहास जनतेसमोर येणार आहे.

Web Title: Nivrutti Chowk special story